मोहसीन शेख हत्या प्रकरण – हिंदू राष्ट्रसेनेचे अध्यक्ष धनंजय देसाईंसह 20 जणांची निर्दोष मुक्तता

संगणक अभियंता मोहसीन शेख याच्या खून प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय जयराम देसाई (वय – 40) यांच्यासह 19 जणांची सबळ पुराव्यांअभावी विशेष न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांनी निर्दोष मुक्तता केली.

फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करून महापुरूषांची बदनामी केल्यानंतर हडपसर भागात 2 जून 2014 रोजी सामाजिक तेढ निर्माण होऊन दंगल सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी मोहसीन शेख (वय – 36) याचा खून करण्यात आला होता. याबाबत मोहसीनच्या 28 वर्षीय भावाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणी देसाई यांच्यासह 20 जणांना अटक करण्यात आली होती.

2 जून 2014 रोजी रात्री 9.15 च्या सुमारास हडपसर परिसरात घरी परतत असताना जमावाने हॉकी स्टीक, स्टंप, बॅट, दगड व काठीने डोक्यावर, चेहर्‍यावर मारून गंभीर जखमा करुन मोहसीन याचा खून केला. तसेच अमीन शेख व एजाज बागवान या दोघांनाही जमावाने जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणी देसाई यांच्यातर्फे अ‍ॅड. मिलिंद पवार, इतर आरोपींतर्फे अ‍ॅड. जे. एन. पाटील, अ‍ॅड. सुधीर शहा, अ‍ॅड. डी. एस. भोईटे, अ‍ॅड. मनीष पाडेकर यांनी काम पाहिले. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. एन. डी. पाटील यांनी युक्तिवाद केला.

कोण आहेत धनंजय देसाई?

देसाई हे हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष, प्रमुख आहेत. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी, उन्नतीसाठी देसाई या संघटनेच्या माध्यमातून कार्य करतात. जून 2014 मध्ये विधानसभा, लोकसभा निवडणूका जाहीर झाल्या होत्या. त्यामुळे राजकीय दबावामुळे या गुन्ह्यात देसाई यांना गोवण्यात आले, असा युक्तीवाद अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी केला. अ‍ॅड. पवार यांचा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी देसाई यांच्यासह इतर 20 जणांची निर्दोष मुक्तता केली.