महिलांनो सजग रहा…

57

बंगळुरू शहरात नुकत्याच्या घडलेल्या महिलांचा अवमान करणाऱया घटना काळजाचा थरकाप उडवणाऱया होत्या. अशा घटनांनी सामाजिक वातावरण ढवळून निघतं, मात्र केवळ चर्चा होण्यापेक्षा सजगता राखत उपाय शोधणं निश्चितच स्वागतार्ह मानलं पाहिजे. याबाबत मत-मतांतरं होत असतानाच जाहिरात क्षेत्रातील नामवंत भरत दाभोळकर यांनी मांडलेला लेखाजोखा.

देशभरात अनेक घटना घडतात. काही लक्ष वेधून घेतात. काही घटनांमुळे आपलं संवेदनशील मन अजूनच घाबरं होतं तर काही घटना या केवळ सुन्न करणाऱया असतात. अशा घटनांपुढे केवळ न् केवळ अंधार दिसू लागतो. काही दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये घडलेल्या घटना या अशाच सुन्न करणाऱया, भेदक वाटल्या. बंगळुरूसारख्या आयटी हब मानल्या जाणाऱया, कॉस्मोपॉलिटिन संस्कृती जपणाऱया शहरात होणारा स्त्रीत्वाचा अपमान खचितच क्लेशदायक वाटला. स्त्रीशक्तीचा आदर करणाऱया प्रत्येकासाठी बंगळुरूमधील महिलांच्या विनयभंगाच्या या घटना रक्त खवळणाऱया न वाटल्या तरच नवल. खरं तर काही वर्षांपासून अशा घटना होण्याचं प्रमाण वाढलं आहे हे नाकारता येणार नाही, पण हे सगळं रोखायचं कसं याचंही उत्तर अद्याप आपल्याकडे नाही.

अशा कोणत्याही घटना घडल्या की, सर्वप्रथम बोट दाखवलं जातं ते कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱयांकडे. पोलिसांनी त्यांच्या कर्तव्यात कुचराई केली, महिलांवर इतके अन्याय होत असतात, पोलीस प्रशासन मात्र ढिम्म आहे अशा अनेक तक्रारींचा सूर हळूच बाहेर येतो. झाल्या घटनांचं खापर पोलिसांवर फोडून प्रत्येक सुजाण नागरिक हवं ते मत व्यक्त करायला मोकळा होतो. खरंच का हो, या सगळ्या स्थितीला आपली कायदा सुव्यवस्था, पोलीस प्रशासन जबाबदार आहे. सुशिक्षित म्हणवणाऱया आपल्यासारख्यांची यात काहीच जबाबदारी नसते का हो! पण आपण हात मोकळे सोडून टाळ्या वाजवायला किंवा ताशेरे ओढायला मोकळे असतो. आपण तितकंच करू शकतो किंवा तितकंच करतो असं म्हणायला हवं. आपल्या देशाची सध्याची लोकसंख्या बघता इतक्या मोठय़ा जनतेची सुरक्षा राखण्यासाठी ही व्यवस्था अपुरी आहे. त्यामुळेच केवळ पोलिसांवर आपल्या संरक्षणाची जबाबदारी टाकणं, त्यांच्यावर भिस्त ठेवणं योग्य नाही.

मुळात प्रश्न उरतोय तो या स्थितीवर तोडगा काय? महिलांची छेडछाड, विनयभंग या घटनांचं प्रमाण वाढलं आहे. प्रत्येक वेळी अशा घटना घडल्या की चर्चा, मत-मतांतरं याला पीक येतं. विचारशील समाजात अशा चर्चा व्हायलाच हव्यात. मागील वर्षी अशाच एका दुर्दैवी घटनेबाबतच्या चर्चासत्रात मी सहभागी झालो होतो. त्यासाठी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मी जाहीरपणे घृणास्पद कृत्य करणाऱया नराधमांना कडक शिक्षा द्यायला पाहिजेत, असे मत व्यक्त केलं होतं. या नराधमांना चौकात उभं करून त्यांचे हातपाय तोडले पाहिजेत, त्यांना लोकांच्या हवाली करून त्यांच्याकरवी लाथाबुक्क्यांचा मार द्यायला पाहिजे आणि स्त्रीत्वाचा अपमान म्हणजे नेमकं काय असतं हे कळेल अशी कठोरातील कठोर वागणूक दिली पाहिजे, असंही मी त्यात म्हटलं होतं. कारण सध्या आपल्याकडे काय होतं तर यांना आरोपी म्हणून तुरुंगातला पाहुणचार मिळतोच. शिवाय यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुह्याने आधीच कितीतरी वर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यांमध्ये भर पडते आणि न्यायव्यवस्थेवरचा बोजा अधिकच वाढतो. पण माझ्या या वक्तव्याचा अर्थ मुस्लिम शरियाशी जोडत हे अमानुष आणि पाशवी असल्याचं समर्थन तिथे हजर असलेल्या इतर वक्त्यांनी केलं. खरं तर त्यांना आपला इतिहासच माहीत नसावा. कारण आपल्या इतिहासात स्त्रीत्वाचा अपमान करणाऱयांना अशाच शिक्षांना सामोरं जावं लागलं होतं. शिवाजी महाराजांच्या काळातील अशी उदाहरणं आजही तो इतिहास आपल्यासमोर जिवंत करतात. गैरकृत्य केल्यास टकमक टोकावरून कडेलोट, हत्तीच्या पायदळी तुडवणं, हात-पाय तोडणं अशा शिक्षा महाराजाच्या काळात दिल्याच्या घटना आपण वाचल्या आहेत. ज्या ऐकूनही आपलं हृदय कापतं तिथे या शिक्षा भोगण्याची नुसती चुणूक जरी त्यांना दर्शवली तरी भविष्यात असे कृत्य करण्यासाठी त्यांचा मेंदू धजावणार नाही हे निश्चित. खरं तर त्यांच्या कृत्यांना कुठेच माफी नसावी, मग त्यांना देण्यात येणारी शिक्षा रानटी, पाशवी का ठरेना.

नववर्षाच्या जल्लोषासाठी बाहेर पडलेल्या महिलांच्या सामूहिक विनयभंगाच्या घटनेने देशाची मान शरमेने खाली झुकली. याचबरोबर शहरातल्या कमनहळ्ळी भागात राहणाऱया तरुणीबाबत घडलेल्या गैरकृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या मुलीने छेड काढणाऱया तरुणांना बेदम चोप देत पोलिसांत तक्रारही केली, पण जे घडलं ते खरोखरच खेदजनक आणि संतापजनक होतं. हा संताप वृत्तवाहिन्यांपासून सोशल मीडियापर्यंत ठायी ठायी व्यक्त होत होता. यात नेतेमंडळींची मतंही घेतली जात होती. यावेळी वृत्तवाहिन्यांचा सहानुभूतीचा सावध पवित्रा आणि घडलेल्या घटनेचं भांडवल करण्याची वृत्ती दर्शवणारे उदाहरण समोर आले ते म्हणजे अबू आझमी यांचं वक्तव्य. अबू आझमी यांनी महिलांचा विनयभंग करणाऱयांना लटकवा, त्यांना कठोर शिक्षा द्या, असं म्हटलं. याचबरोबर मुलींनी, महिलांनी स्वतŠची काळजी, सुरक्षा घेण्याबाबतही सजग राहिले पाहिजे असंही म्हटलं आहे. मात्र वृत्तवाहिन्यांनी सोयिस्करपणे त्यांना हवं ते राखत इतर भाग कापला. यात कोणतीही अतिशयोक्ती नसून केलेल्या वक्तव्याचा गैरअर्थ काढला गेला हे मात्र निश्चित. समाजात जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा अनेक प्रकारची विधानं केली जातात. ही विधानं कधी गैरलागू असतात, कधी हास्यास्पद असतात तर कधी उद्धटही असू शकतात, परंतु त्यांचा हेतू निर्लेप व शुद्ध असतो. केवळ त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे मत व्यक्त केलेलं असतं. यामुळेच घडते ती विवादात्मक स्थिती ज्यामुळे मूळ प्रश्नांना माध्यमं खरोखरच बगल देतात.

खरंतर महिलांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा मी आदरच करतो. त्यांनी काय करावं, काय नको, त्यांनी कोणते कपडे घालावेत, कुठे फिरायला जावं याबाबत त्यांना स्वातंत्र्य असायलाच हवं. मात्र घडणाऱया घटनांच्या पार्श्वभूमीवर अबु आझमी यांचं विधान विचारात घेणे गरजेचे आहे. समाजात वावरताना तिथली सामाजिक स्थिती बघूनच आपलं वर्तन असावं असं मला वाटतं. अबू आझमींनी केलेल्या, ‘महिलांनी स्वतःबाबत, स्वतःच्या पेहरावाबाबत, सुरक्षेबाबत सजग राहिले पाहिजे,’ या विधानाला माझी काही सहमती आहेच. मात्र माझ्या या मताला आव्हान देणारा विचार आपोआपच समोर येतो तो म्हणजे मुलींना त्यांचा पेहराव बदलण्यास भाग पाडू नका तर मुलांची विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न करा. हा विचारच मला माझ्या मनातल्या अनेक प्रश्नांना आणि त्यांच्या उत्तरांना चव्हाटय़ावर आणण्यास भाग पाडतो. खरंच ही विचारसरणी बदलणं आताच्या स्थितीत शक्य आहे का? तुम्ही कोणाकोणाला बदलण्यास भाग पाडणार आहात? प्राप्त स्थितीत हा बदल खरोखरच होऊ शकेल? असे एक ना अनेक प्रश्न मोहोळागत समोर येतात. अद्याप तरी या प्रश्नांची पटण्याजोगी उत्तरं मिळाली नाहीत. हम कपडे नही बदलेंगे, उनको अपने विचार बदलने को बोलो, हे महिलांच्या सक्षमतेबाबतचं विधान ऐकायला अगदी भारी वाटतं, पण हे आपण कसं करणार आहोत. अशा लोकांचे fिवचार बदलण्याची क्रिया काही एका रात्रीत घडणारी नाही. स्त्र्ायांप्रति आदर राखण्याची शिकवण त्यांना द्यायला हवी असा सूर आळवला जातो. मग आतापर्यंत त्यांच्या पालकांनी, त्यांच्या शिक्षकांनी ‘स्त्र्ायांचा अनादर करा’, अशी शिकवण तर नक्कीच दिलेली नसेल ना! आपला समाज किंवा शिक्षण व्यवस्था काही अशी शिकवण देत नाही किंवा कोणतंही कुटुंब आपल्या मुलांना असं वागण्यास प्रवृत्त करत नाहीत. खरं सांगा, आपली मुलगी वा मुलगा यांची विचारसरणी बदलणं आपल्याला कितपत शक्य आहे? शिक्षणाने वागणुकीतील चांगला बदल निश्चितच घडू शकतो, पण मुळात गरज आहे ती त्यांची मानसिकता बदलण्याची आणि ही मानसिकता बदलणं काही आपल्या हाती नाही.

माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने गेल्या २५ वर्षांचा जनसंपर्काचा अनुभव हेच सांगतो की, लोकांची मानसिकता बदलवणं ही काही सहजसाध्य गोष्ट नाही. अमुलसारखं ब्रॅण्ड घडवताना आलेल्या अनुभवांपैकी एक म्हणजे कोणतंही चॉकलेट घेताना लोक अजूनही कॅडबरीच मागतात. विशिष्ट ग्राहकवर्गाला नजरेसमोर ठेवून जाहिरातीसाठी लाखोंची उलाढाल करताना, प्रयत्नांची शर्थ लढवताना त्यांची मानसिकता बदलेल का? याबाबत साशंकता असेल तर इतक्या मोठय़ा नजरेच्या टप्प्यातही न सामावणाऱया, संपूर्णतŠ अनोळखी असलेल्या वर्गाची मानसिकता बदलेल अशी अशा बाळगणं चुकीचंच आहे.

अबू आझमीसारखी व्यक्ती या परिस्थितीचा अंदाज घेत जेव्हा महिलांच्या सुरक्षेबाबतचं विधान करते तेव्हा त्यात खरोखरच चूक असं काहीच वाटत नाही. आपल्या मौल्यवान वस्तू, कार यांची आपण काळजी घेतोच की… चोरांनी त्यांचे विचार बदलावे अशी अपेक्षा आपण याबाबत करतो का? मग आपला आत्मसन्मान, व्यक्तिनिवेष याबाबत आपण का विचार करू नये? अशी विधानं झाल्यानंतर पुरुषांच्या बरोबरीने महिलांना न जोखता त्यांचा अपमान व्हावा म्हणूनच केली जात आहेत, असाच अर्थ यामागे का काढला जातो. ही विधानं करण्यामागचं नेमकं कारण, त्यांची बाजू आणि काळजी का विचारात घेतली जात नाही. कदाचित माझं हे मत सगळ्यांना मान्य होईलच असं नाही पण याशिवाय इतर कोणते उपाय आपल्या हाती आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या