नवजात मुलीच्या हत्येचा सहा महिन्यांनी उलगडा; आईनेच घेतला जीव

829

पश्चिम बंगालमधील आनंदपूरच्या नोनाडंगामध्ये तीन दिवसांच्या मुलीचा सहा महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. पोलिसांनी या मृत्यूप्रकरणाचा उलगडा करत आईनेच मुलीचा जीव घेतल्याचे तपासातून स्पष्ट केले आहे. नवजात मुलीची आईनेच हत्या केल्याची या वर्षातील ही दुसरी धक्कादायक घटना आहे. पहिली घटना बेलियाघाटातील असून आनंदपूरमधील ही दुसरी घटना आहे. या हत्या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी मुलीची आई सोनिया सेनला अटक केली आहे. मुलीची हत्या केल्याची कबुली सोनिया सेनने दिली आहे.

देशभरात कोरोनाचे संकट फैलावल्यामुळे घटनेनंतर पाच महिन्यांनी पोलिसांना मुलीचा शवविच्छेदन अहवाल मिळाला. या अहवालात मुलीच्या गळ्यावर व्रण आढळून आले. त्यामुळे मुलीचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू नसून तिची हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी तपासाची सूत्रे फिरवली. यावर्षी 5 फेब्रुवारीला घरातच तीन दिवसांची मुलगी मृतावस्थेत आढळली होती. आपण एका खोलीत आपल्या दीड वर्षाच्या मुलाला आणि या नवजात मुलीला ठेवून बाथरुमला गेल्याचे सोनिया सेनने पोलिसांना सांगितले. बाथरुममधून आल्यानंतर मुलगी मृतावस्थेत आढळली. मुलगा तिच्याबरोबर खेळत असताना मुलीचा मृत्यू झाल्याची शक्यता तिने वर्तवली होती. मात्र, शवविच्छेदन अहवाल तिच्या जबाबाशी जुळत नव्हता. त्यामुळे तिची कसून चौकशी केली असता, तिने हत्या केल्याची कबुली दिली. तसेच मुलासोबत खेळताना मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव रचल्याचेही तिने सांगितले, अशी माहिती सहपोलीस आयुक्त (गुन्हे) मुरलीधर शर्मा यांनी दिली.

आपल्या पतीचे अनैतिक संबंध असून तो मुलीचे योग्यप्रकारे संगोपन करणार नाही, अशी आपल्याला भीती होती. तसेच भविष्यात मुलीचे हाल होऊ नयेत, यासाठीच आपण मुलीची हत्या केल्याचे सोनिया सेनने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिला अटक केली असून मानसोपचार तज्ज्ञांकडून तिची तपासणी केल्यानंतर पुढील कार्यवाही करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या