नवी मुंबई मेट्रोचा मुहूर्तः डिसेंबर 2022

नवी मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सिडकोने 20 तज्ज्ञ अभियंत्यांचा एक गट तयार केला आहे. बेलापूर ते पंधर यादरम्यान मेट्रोची प्रवासी सेवा डिसेंबर 2022 पर्यंत सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न सिडको आणि मेट्रोच्या प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी आणि मेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रो साईटला भेट देऊन कामाचा आढावा घेतला आणि काम लवकर पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

नवी मुंबई मेट्रो हा सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मात्र विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून या प्रकल्पाची रखडपट्टी झाली आहे. हे काम लवकर पूर्ण होण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सर्व अडथळ्यांचा शोध घेण्याचे आदेश अभियांत्रिकी विभागाला दिले होते. त्यानंतर मेट्रो मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी सिडकोने महामेट्रोची नियुक्ती केली आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी आणि मेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी पहिल्या टप्प्यातील रेल्वे मार्गाची आणि मेट्रो कारशेडची पाहणी केली. याप्रसंगी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल यांच्यासह दोन्ही प्राधिकरणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सीएआरएसचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मेट्रो स्थानक 7 ते 11 दरम्यानची सेवा डिसेंबर 2021 आणि मेट्रो स्थानक 1 ते 7 दरम्यानची सेवा डिसेंबर 2022 मध्ये सुरू करण्याचे प्रयत्न सिडकोने सुरू केले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील मेट्रोची प्रवासी वाहतूक डिसेंबर 2022 मध्ये पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.

आर्थिक स्त्रोत निर्माण करणार नवी मुंबईचा मेट्रो प्रकल्प एकूण चार टप्प्यांत पूर्ण होणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील सेवा लवकर सुरू करण्यासाठी हे काम महामेट्रोला देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी आर्थिक चणचण भासू नये याकरिता सिडकोने आर्थिक स्त्रोत निर्माण केले आहे. मेट्रो मार्गालगतच्या भूखंडांना वाढीव एफएसआय देण्यात आला आहे, असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या