सरकारी चमत्कार! कर्जमाफीचे खात्यात आलेले पैसे परत काढून घेतले

68

सामना ऑनलाईन । पंढरपूर

पंढरपुरात सरकारी चमत्काराचं दुर्मिळ उदाहरण पहायला मिळालं आहे, इथे दोन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम सरकारने काढून घेतली आहे. ही रक्कम या शेतकऱ्याला कर्जमाफी योजनेमुळे मिळाली होती. यामुळे कर्जमाफीत झोल केल्याची भावना राज्यातील शेतकऱ्यांच्या मनात खोलपणे रुजायला लागली आहे. पारदर्शक कारभार आणि मी लाभार्थी यासारख्या जाहिरातीमधून शासन कर्जमाफीची टिमकी वाजवीत असताना पंढरपूर तालुक्यात आत्तापर्यंत अशी दोन उदाहरणं समोर आली आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

पंढरपूर तालुक्यातील उपरी गावाचे देवानंद गणपत जगदाळे यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या गादेगाव शाखेतून ६४,४०१ रुपयांचे कर्ज घेतले होते. फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये या शाखेतील ८ कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आणि त्यांच्या खात्यात ३१ ऑक्टोबर रोजी कर्जाची रक्कम जमा झाली. त्यानंतर बँकेने देवानंद जगदाळे यांना मेसेज पाठवून कर्जखाते संपल्याचे कळविले. कर्जमाफीचा आनंद जगदाळे कुटुंबाला झाला मात्र हा आनंद फारकाळ टिकला नाही. बँकेने १३ नोव्हेंबर रोजी पुन्हा मेसेज पाठवत खात्यातील पैसे काढून घेतल्याचं त्यांना कळवण्यात आलं.

जगदाळे यांच्याप्रमाणे गादेगाव येथील अर्जुन कदम यांना देखील ५६,५१६ रुपयांची कर्जमाफी झाली होती. मात्र त्यांच्याही खात्यातील रक्कम परत सरकारने काढून घेतल्याने आता यांच्या आनंदाची जागा भीतीने घेतली आहे. याबाबत बँक व्यवस्थापक शिवाजी रायभान यांनी सरकारने पैसे पुन्हा काढून घेतल्याचे मान्य केले असून याबाबत बँकेला कोणतीच सूचना मिळाली नसल्याने पैसे का परत घेतले याची माहितीही देण्यात आली नसल्याचे बँकेचे म्हणणे आहे. जगदाळे यांच्याकडे दुसऱ्या कोणत्याच बँकेचे कर्ज नसून आता सरकारकडूनच फसवणूक झाल्याची भावना या शेतकऱ्यांची आहे. जगदाळे आणि कदम या दोन शेतकऱ्यांची कर्जखात्यात भरलेली रक्कम परत गेल्याने आता बँक कर्जफेडीसाठी विचारणा करू लागल्याने ही औटघटक्याची कर्जमाफी म्हणजेच सरकारकडूनच या शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करण्यात आली आहे .

आपली प्रतिक्रिया द्या