सत्तेतून पैसा आणि  पैशातून सत्ता हेच भाजपचे धोरण; संजय राऊत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मोदींचा फायदा हा देशाला नाही, तर फक्त भाजपला होत आहे. सत्ता आणि निवडणुका यापलीकडे ते जात नाहीत. मुंबईसह 14 महापालिकांच्या निवडणुका का रखडवल्या आहेत, असा सवाल करतानाच सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच भाजपचे एकमेव धोरण असल्याचा टोला लगावत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, हा देश फक्त भाजपच्या फायद्यासाठी चालू आहे. त्यासाठीच अदानी, मेहुल चोक्सी, नीरव मोदी यांच्यासारख्या घोटाळेबाजांना पाठीशी घालायचं. या धोरणाने त्यांचे राज्य चालले असेल तर निवडणूक आणि सत्ता याशिवाय त्यांच्या डोक्यात अन्य काही असेल असं मला वाटत नाही, अशी टीका त्यांनी केली.

एकत्र निवडणुकांस आम्ही तयार

भाजपला निवडणुका जिंकता याव्यात, सत्ता मिळावी, त्यापलीकडे कुठलाच विचार केला जात नाही. जर त्यांची लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची तयारी असेल तर आम्हीही त्यासाठी तयार आहोत, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.

देशात अनेक गोष्टी घडतायेत त्या इतिहासात कधी घडल्या नाहीत. एका उद्योगपतीला वाचवण्यासाठी भाजप कामाला लागलीय. दिल्लीच्या महापौरपदाची निवडणूक होऊ देत नव्हते. दिल्लीतील सरकार लोकांनी निवडलेले आहे. आज अर्थसंकल्प होऊ दिला जात नाही, असे संजय राऊत म्हणाले.

बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना एका फुटीर गटाच्या हाती देण्याचा मोठा सौदा भाजपाने केला. निवडणूक आयोगाचा वापर केला जातो. देशातील लोकशाही संपतेय म्हणून टीका करणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांचे संसदेतील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी देशाच्या इतिहासात कधी घडली नव्हती असे ते म्हणाले.

भुसेंच्या दाढीला आग लागण्याचे कारण काय?

गिरणा अॅग्रोच्या नावाने दादा भुसे यांनी शेतकऱ्यांकडून 175 कोटींचे शेअर गोळा केले, पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. याबाबत मी आरोप केलेला नाही, तर खुलासा मागितला होता. शेतकरी खुलासा मागत आहेत. यामध्ये भुसे यांच्या दाढीला आग लागण्याचे कारण काय, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. मी यांच्यामुळे खासदार झालेलो नाही, तर मला त्या वेळच्या शिवसेना आमदारांनी निवडून दिले आहे. तुम्ही उद्धव ठाकरे यांचे असताना मोदी आमचा बाप आहे म्हणता याचे उत्तर द्या, असे राऊत म्हणाले.