दुप्पट पैशासाठी घर विकले, पत्नीचे दागिने ठेवले गहाण

918

तांत्रिक विद्येच्या जोरावर पैशाचा पाऊस पाडण्याच्या भूलथापा मारून इस्टेट एजंटला चुना लावणाऱया निशवीत कुमार शेट्टी याच्या युनिट 9 ने मुसक्या आवळल्या. त्याच्या भूलथापांना बळी पडून तक्रारदारांनी राहते घर विकले, पत्नीचे दागिने गहाण ठेवले होते.

तक्रारदार यांची काही वर्षांपूवी शेट्टी सोबत ओळख झाली होती. मध्य प्रदेश येथील एक गुरुजी पैशाचा पाऊस पाडतो. श्रीमंतीचे स्वप्न पाहून तक्रारदारांनी राहते घर विकले, पत्नीचे दागिने गहाण ठेवून टप्प्याटप्प्याने 1 कोटी 12 लाख रुपये शेट्टीला दिले. तर विश्वास बसावा म्हणून शेट्टीने दोन वेळेस तक्रारदारांना मीरा रोड येथील भाडय़ाच्या घरात नेऊन खेळण्यातील खोटय़ा नोटा थर्माकोल वर लावल्या. अंधाराचा फायदा घेत नोटा खोलीभर असल्याचे शेट्टीने भासवले. वांद्रे येथे काही जण पैशाचा पाऊस पाडण्याची चर्चा करत असल्याची खबर युनिट 9 च्या पोलीस निरीक्षक आशा कोरके यांना मिळाली. पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या पथकाने सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत शेट्टीचे नाव समोर आले. पोलिसांनी शेट्टीच्या मीरा रोड येथील घरात छापा मारून खोटय़ा नोटा, युनायटेड स्टेटचे सेविंग बॉण्ड आणि काळ्या कापडाची बाहुली, नारळ, हळद, लिंबू आदी जप्त केले. त्याच्या विरोधात फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तर गुरुजी आणि एकाचा पोलीस शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या