सखेसोबती…घरात येणारी  माकडं

99

योगेश नगरदेवळेकर ,[email protected]

वरचेवर बातमी वाचण्यात येते की उपनगरात माकडांचा उपद्रव… काय करावे अशावेळी?

परवाच एका दैनिकात बातमी वाचली की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातल्या उपनगरात माकडांचा त्रास वाढला आहे. ते आता सहजपणे इमारतींमध्ये शिरून खिडकीत किंवा गॅलरीत नासधूस करत आहेत.

या माकडांचे आश्रयस्थान असलेलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे अतिशय समृद्ध जंगल आहे. जंगलातील वरच्या श्रेणीचा शिकारी समजले जाणारे बिबळे येथे वावरतात. त्यामुळे हे परिपूर्ण जंगल मानलं जातं. याच जंगलात अन्नाच्या उपलब्धतेमुळे माकडांचाही भरपूर वावर आहे.

माणसाच्या जवळचे भाईबंद म्हणून माकडाकडे पाहिले जाते. जवळपास माणसासारखेच एकत्र राहणे, समाजव्यवस्था असणे यामुळे माकडे कुतूहलाचा विषय ठरतात. यामध्ये मादीला एक किंवा दोन पिलं होतात. मादी पिलांचं संगोपन करते. पिलू काय खाते याची प्रथम चव मादी घेते. काय खावे, काय खाऊ नये हे पिलाला शिकवते. झाडाच्या फांदीवर कसे चढावे, उडय़ा कशा माराव्यात याचे प्रशिक्षणही आईकडून मिळते. प्रसंगी पिलाला थप्पड मारायला पण कमी करत नाही.

मुंबईच्या या जंगलात बॉनेट मॅकॉक, ऱहीसस मॅकॉक आणि हनुमान लंगूर या जातीची माकडे आढळून येतात. हनुमान लंगूर अर्थातच नावाप्रमाणे रामायणातील हनुमानाशी जोडला गेला आहे. या प्रजातीतील नर साधारण 50 सें.मी. ते 80 सें.मी. एवढा वाढतो तर माद्या त्यांच्यापेक्षा लहानखुऱया असतात. शेपटाची लांबी 70 सें.मी. ते एक मीटरपर्यंत असू शकते.

रामाला लंकादहनात मदत करताना हनुमान आगीच्या जाळात वेढले गेले. त्यामुळे त्यांचा चेहरा भाजून काळा झाला अशी दंतकथा आहे. त्यामुळे आता आढळणाऱया हनुमान लंगुराचा चेहरा काळा असतो असे म्हटले जाते. देवतांशी जोडले गेल्याने या प्रकारच्या माकडाला पूजनीय मानले जाऊन त्याला त्रास दिला जात नाही. बॉनेट मॅकॉक, ऱहीसस मॅकॉक ही त्यामानाने लहान आकाराची माकडे आहेत. यातील नर साधारण 50 सें.मी. उंचीचा असतो आणि वजन साधारण 6 ते 7 किलोपर्यंत असते, तर मादीची वाढ 40 सें.मी. व वजन 4 ते 5 किलोपर्यंत असते.

हे टोळीमध्येच राहतात. सगळय़ा टोळीचा एक प्रमुख नर असतो. त्याच्या अधिपत्याखाली सर्व टोळी वागत असते. सर्वात प्रमुख नराला अल्फा मेल असे म्हणतात. त्यानंतरच्या उतरंडीमध्ये बीटा आणि गॅमा नर येतात. प्रत्येक टोळीचे क्षेत्र वेगळे असते. आपल्या क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी वेळप्रसंगी टोळय़ांची आपापसात भांडणे होतात. नेता नेहमी टोळीच्या आघाडीवर असतो. आसमंताचे निरीक्षण करून कुठे जायचे ते ठरवतो. लहान पिले आईच्या पोटाला चिकटून असतात. धोका नसल्यास जमिनीवर बागडतात. नेत्याकडून इशारा मिळताच आया पिलांना बोलावतात व सुरक्षित ठिकाणी पळून जातात. ‘पाठी खाजवणे’ हा त्यांचा आवडता छंद असतो. दिवसभर जर जमिनीवर वावरत असले तरी रात्री झोपेसाठी झाडाच्या वरच्या टोकाला जातात. आपण नेहमी बघतो ती माकडं म्हणजे बॉनेट मॅकॉक-‘टोपीवाले माकड’ आणि ऱहीसस मॅकॉक याचे तोंड लाल असते. मदाऱयांकडे असतात ती हीच माकडे. बहुतेक माकडं शाकाहारी असतात. फळे, झाडांची कोवळी पानं हे त्यांचं मुख्य अन्न. अन्नाच्या शोधार्थ टोळय़ा जंगलभर फिरत असतात.

संजय गांधी उद्यानाला लागूनच मानवी वस्ती असल्याने माकडं सहजपणे वस्तीत शिरतात. शहरात आल्यावर कचऱयात सापडणारे सहज अन्न त्यांना शहरात वारंवार येण्यास आकृष्ट करू लागले आहे. त्याबरोबरच उद्यानात फिरायला येणारे माकडांसाठी खाऊ घेऊन येतात. हीच सवय त्यांना आयतं खायची संधी मिळवून देते आणि इतक्या सहजपणे खाद्यपदार्थ मिळत असल्याने हुशार माकडं आता शहरात शिरू लागली आहेत.

या सर्व प्रकारात विजेचा शॉक लागून किंवा वाहनाखाली येऊन त्यांचा मृत्यू ओढवतो. तसेच माकड पिसाळून माणसांना चावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरात आलेली माकडे पकडून परत जंगलात पाठवणे कठीण आणि खर्चिक बाब आहे. आपणच शहाणे होऊन माकडांना खाऊ न घालणे हे जरी लक्षात ठेवले तरी या त्रासातून दिलासा मिळेल आणि त्यांचे प्राण वाचवल्याचा आनंदही.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या