बेस्टच्या संपाने मोनोची कळी खुलली, उत्पन्न दुपटीने वाढले

22
mumbai-monorail-001

सामना ऑनलाईन । मुंबई

मोनोरेलच्या कर्मचाऱ्यांनी पगार आणि उर्वरित देण्यांच्या संदर्भात पुकारलेला संप अचानक मागे घेतला आहे. दरम्यान, बेस्टच्या संपामुळे एरव्ही रिकामी धावणारी मोनोरेल आता बेस्टअभावी अडलेल्यांना घेऊन धावत आहे. त्यामुळे दररोज सरासरी 15 हजार असणारी तिची प्रवासी संख्या बेस्टच्या संप काळात 25 हजारांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे उत्पन्नातही दुपटीने वाढ झाली आहे.

मोनोच्या जुन्या व्यवस्थापनाच्या अंतर्गत असलेल्या कामगारांनी त्यांच्या पगार आणि अटी-शर्तींवर 11 जानेवारी रोजी संपाची हाक दिली होती. परंतु यासंदर्भात मोनोचा कारभार हातात घेणाऱ्या एमएमआरडीएने ठोस आश्वासन दिल्याने आजचा संप मोनो कर्मचाऱयांनी मागे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

बेस्टच्या संप काळात मोनोरेलच्या उत्पन्नाची आकडेवारी
7 जानेवारी- प्रवासी- 15,859, उत्पन्न – 1,14,763
8 जानेवारी- प्रवासी- 22,965, उत्पन्न -1,54,993
9 जानेवारी- प्रवासी- 23,833, उत्पन्न -1,60,213
10 जानेवारी- प्रवासी- 25,451, उत्पन्न -1,72,854

मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही! परळच्या मेळाव्यात बेस्ट कामगारांचा निर्धार
‘बेस्ट’ कामगारांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा निर्धार शुक्रवारी परळ येथील मेळाव्यात बेस्ट कामगारांनी व्यक्त केला. संप सुरूच ठेवून कोर्टाच्या निर्देशानुसार नेमलेल्या समितीशी चर्चा करण्याचा ठरावही या वेळी मंजूर करण्यात आला. पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या आडमुठेपणामुळेच महापौरांच्या उपस्थितीत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चाललेली चर्चा निष्फळ ठरली, असे या वेळी कृती समितीचे शशांक राव यांनी सांगितले. कृती समितीकडून संयमाने संप सुरू असून प्रशासनाने संप चिरडून टाकण्याचा प्रयत्न केल्यास पालिका आणि सरकार जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. ‘बेस्ट’ समिती, महासभेने अर्थसंकल्प विलीन करण्याचा प्रस्ताव मंजूर करूनही आयुक्त हा प्रस्ताव शासनाकडे जाणीवपूर्वक पाठवत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. कृती समितीच्या आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठिंबा दिल्याचेही त्यांनी या वेळी जाहीर केले.

आपली प्रतिक्रिया द्या