पावसाचा ‘प्रचार’ जोरात! मान्सूनचा मुक्काम वाढला… प्रचारसभांवर ‘पाणी’

788
rain

विधानसभा निवडणूक प्रचाराला अवघे दहा दिवस राहिले असतानाच महाराष्ट्रात मान्सूनचा मुक्काम वाढला आहे. परतीचा पाऊस जोरदारपणे कोसळत असल्यामुळे पुणे, ठाणे, पालघर, कोकणसह अनेक ठिकाणी संध्याकाळच्या  प्रचारसभांवर ‘पाणी’ पडत असून, पावसाच्या ‘प्रचारा’ने उमेदवारही हैराण झाले आहेत. कमी वेळेत मतदारांपर्यंत पोहचायचे कसे? हा प्रश्न पडला आहे. दरम्यान, मुंबईसह पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर, सोलापूर आणि मराठवाडय़ातील बहुतांशी ठिकाणी 14 ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

बुधवारी जोरदार पावसाने पुणे, ठाणे, कोकणसह, पश्चिम महाराष्ट्रात सातारा, पंढरपूर, वाई, अक्कलकोट, मंगळवेढा, गगनबावडा तसेच मराठवाडय़ात  संभाजीनगर, उमरगा, मुखेड येथे झोडपले. एक तासाच्या पावसाने पुणे शहर तुंबले. वाहतूककोंडीने नागरिक हैराण झाले. त्यामुळे संध्याकाळचा प्रचार रद्द करावा लागला. 21 ऑक्टोबरला मतदान आहे. 19 ऑक्टोबरला संध्याकाळी प्रचार संपत आहे. मात्र, रोजच पाऊस कोसळत असल्याचा परिणाम विधानसभा निवडणूक प्रचारावर होत आहे.

14 पर्यंत काय आहे हवामान खात्याचा अंदाज?

  • कोकण- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पाऊस. त्यानंतर पुढील तीन दिवस पाऊस कोसळणार.
  • पश्चिम महाराष्ट्र-कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नगर येथे काही ठिकाणी वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता.
  • मराठवाडा- संभाजीनगर, परभणी, बीड, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्हय़ांमध्ये काही ठिकाणी वादळवाऱ्यासह, तर काही तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 14 ऑक्टोबरपर्यंत कोसळण्याची शक्यता आहे.
  • पुणे- शनिवारपर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस. त्यानंतरचे दोन दिवसही जोरदार पावसाचा अंदाज.
  • मुंबई- शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. त्यानंतरचे तीन दिवस हलका ते मध्यम पाऊस.
  • ठाणे- रविवारपर्यंत वादळी पाऊस. सोमवारी हलका ते मध्यम पाऊस कोसळण्याचा अंदाज.
आपली प्रतिक्रिया द्या