आनंदी आनंद… मान्सून अंदमानात दाखल

34

सामना ऑनलाईन । पुणे

देशातील सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनचे आगमन झाले असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. तसेच मंगळवारी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाच्या एक दिवस आधीच मान्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल झाला आहे. अंदमानच्या उत्तरी भागात पाऊस सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

हवामना विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार अंदमान-निकोबार बेटांवर दाखल झालेल्या मान्सूनमुळे अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातल्या काही बेटांवर जोराचा किंवा अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे १५-१६ तारखेला अंदमानातील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

अंदमानात दाखल झालेला पाऊस नैऋत्त मान्सूनचाच असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मान्सूनची आगेकूच व्हायला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच बंगालच्या उपसागरात नैऋत्त मोसमी पावसाची आगेकूच होणार असल्याने राज्यात लवकरच पावसाचे आगमन होण्याची चिन्ह आहेत. यंदा ‘एल निनो’चा प्रभाव कमी असल्याने चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या