‘मान्सून एक्सप्रेस’ उशिरानं? वाचा हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती

उकाड्यानं लोक हैराण झाले असून सगळ्यांच्या नजरा मान्सूनच्या आगमनाकडे लागल्या आहेत. यंदा मान्सून सामान्य असणार असल्याचा अंदाज आधीच देण्यात आला आहे. मात्र जून महिना सुरू होत असल्यानं मान्सूनची सुरुवात कधी होणार असे वेध साऱ्यांनाच लागले आहेत. मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान विभागानं महत्त्वाची माहिती दिली आहे. मान्सूनने अंदमान आणि निकोबारची संपूर्ण बेटं व्यापली आहेत. केरळमध्ये मान्सून दाखल होण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत. दरवर्षी केरळमध्ये मान्सून एक जून रोजी दाखल होतो. यंदा मात्र केरळमध्ये मान्सून दाखल होण्यास 4 जून ते 5 जून उजाडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे बंगालच्या उपसागराचा बराचसा भाग येत्या काही दिवसात मान्सूनने व्यापणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागानं वर्तवला आहे. यावर्षी मान्सून हा सात ते आठ दिवस संथ गतीनं सुरू असून केरळमध्ये दाखल व्हायला मान्सूनला 4 किंवा 5 जून उजाडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे यंदाची ‘मान्सून एक्सप्रेस’ उशिरानं धावत असल्याचं सध्या तरी दिसत आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या मोचा चक्रीवादळामुळे मान्सूनची प्रगती संथ गतीने सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, जूनमधे सरासरीच्या कमी पाऊस पडणार असल्याची शक्यता याआधीच्या अंदाजातून वर्तवण्यात आली आहे. तसंच उन्हाळा लांबणार असल्याचाही अंदाज आहे.