सांगली जिल्ह्यात पाऊस परतला

मागील पंधरा दिवस दडी मारल्यानंतर मंगळवारी जिल्ह्यात पाऊस परतला. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत; परंतु संततधार पावसामुळे पेरण्यांना वेग येण्याच्या आशा निर्माण झाल्या. उशिराने सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱयांना दिलासा मिळाला. कोयना, चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून, धरणांतील पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ होत आहे.

जिल्ह्यात दडी मारलेल्या मान्सूनच्या पावसाने मंगळवारपासून जिल्ह्यात चांगली हजेरी लावली आहे. जिह्याच्या सर्वच तालुक्यांत दिवसभर रिमझिम पाऊस सुरूच होता. अनेक ठिकाणी संततधार पाऊस सुरू होता. पेरणीसाठी सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्र आहे. मात्र, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे पावसाकडे शेतकऱयांचे लक्ष होते. उशिराने सुरू झालेल्या पावसानंतर कमी कालावधीची पिके घेतली जाणार आहेत. त्यामुळे बुधवारपासून जिह्यात पेरण्यांना गती येणार असल्याचे चित्र दिसत आहे.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. कोयना आणि वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने धरणांच्या पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ होत आहे. मंगळवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोयना धरणात 28.32 टीएमसी पाणीसाठा होता. चार दिवसांत चार टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दिवसात 54 मिलिमीटर तर वारणा धरण क्षेत्रात 29 मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात सध्या 15.95 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सांगली, मिरज शहरांसह जिह्यात दिवसभर पावसाची संततधार सुरू होती.

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत पडलेला पाऊस व कंसात दि. 1 जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलिमीटरमध्ये ः मिरज 2.6 (68.8), जत 1.6 (56.4), खानापूर 3 (50.7), वाळवा 4.6 (72), तासगाव 5 (83.7), शिराळा 16.3 (211.2), आटपाडी 1.3 (54.3), कवठेमहांकाळ 2.1 (54), पलूस 3.1 (59.1), कडेगाव 3.4 (62.8).