मान्सूनची केरळ-तामीळनाडूत टंगळमंगळ; महाराष्ट्राच्या दिशेने कूच

17

अमोल कुटे । पुणे

केरळमध्ये वेळेआधी दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) तब्बल आठवडाभर रेंगाळलेली वाटचाल सुरू झाली आहे. मंगळवारी (दि. ६) मान्सूनने केरळचा बहुतांशी भाग, तामीळनाडूचा आणखी काही भाग व्यापाला असून, महाराष्ट्राच्या दिशेने कुच केली आहे.

बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘मोरा’ चक्रीवादळामुळे मॉन्सून सर्वसाधारण वेळेच्या दोन दिवसआधीच केरळात दाखल झाला होता. मॉन्सून केरळात दाखल होण्याबाबतचा हवामान विभागाचा अंदाज दहा वर्षांनंतर प्रथमच अचूक ठरला. मात्र ‘मोरा’ वादळ निवळल्यानंतर मॉन्सूनची पुढील वाटचाल मंदावली, आणि मॉन्सून केरळातच रेंगाळला होता.

मंगळवारी (दि. ६) अरबी समुद्राच्या पश्चिममध्ये भागामध्ये हवेचा ठळक कमीदाबचे क्षेत्र तयार झाल्यानंतर मान्सूनच्या वाटचालीस पुन्हा गती मिळाली आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र येत्या २४ तासांमध्ये ओमानच्या दिशेने सरकण्याचे संकेत आहेत. दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे आणि बंगालच्या उपसागरातही मान्सून वाऱ्यांनी प्रगती केली आहे. केरळ, कर्नाटकच्या किनारपट्टीलगतच्या समुद्रात ढग गोळा झाले आहेत. पुढील दोन दिवसांत मान्सून आणखी काही भागात दाखल होण्यास पोषक वातावरण आहे.

मंगळवारी सकाळपासून राज्यात सकाळपासूनच ढगाळ हवामान तयार होऊ लागले आहे. मुंबईसह राज्यात उकाडा प्रचंड वाढला असून, घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. दुपारनंतर राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या