चंद्र विरघळतोय…

104

<<  अंतराळ  >>   << नितीन फणसे >>

प्रियतमेला चंद्राची उपमा देतायजरा थांबा. कारण चंद्र विरघळतोयउपमा देण्यासाठीही तो शिल्लक उरेल का अशी चिन्हे आहेत. ब्रह्मांडातल्या तीक्र सौरवादळाच्या प्रभावाने चंद्रावरील बर्फ झपाटय़ाने वितळायला लागलायसूर्याच्या उष्णतेमुळे चंद्राच्या पृष्ठभागावरील माती आणि बर्फ यांचं बाष्पीभवन होतंय. ‘नासाने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासातून हे उघड झालं आहे.

चंद्रावर कोणतंच वातावरण नाही आणि चंद्राचे गुरुत्वाकर्षणही कमजोर आहे. म्हणून तेथील पर्यावरण कठीण आहे. ‘नासा’ने या कठीण पर्यावरणाचा अभ्यास केला तेव्हा त्यातून धक्कादायक निष्कर्ष निघालाय… चंद्राच्या पृष्ठभूमीचे नमुने ‘नासा’ने अभ्यासले असून त्यातून चंद्र आणि सूर्याच्या इतिहासावर प्रकाश पडू शकतो. अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायर विद्यापीठाचे प्रा. अँड्रय़ू जॉर्डन यांनी ‘इकारस’ नावाच्या साप्ताहिकात प्रसिद्ध केलेल्या लेखात म्हटलंय की, उल्कांच्या आघाताने आणि सौरवादळांमुळे चंद्राच्या पृष्ठभागापैकी किमान १० टक्के भाग विरघळून गेला आहे. चंद्राचा कायम अंधारात राहणारा भाग तुलनेने जास्त थंड असतो. तो भाग सूर्याच्या प्रभावामुळे जास्त लवकर वितळू शकतो.

सूर्यातून निघणाऱया आगीच्या ज्वाळा काहीवेळा रौद्ररूप धारण करतात. पृथ्वीवरही म्हणूनच काहीवेळा गरमी वाढते. चंद्रावरही या ज्वाळांचा परिणाम होत असल्याचं या संशोधनातून समोर आलं आहे. या ज्वाळांमध्ये काहीवेळा इतकी प्रचंड ताकद असते की त्यातून निघणारी किरणे चंद्राच्या पृष्ठभागावरची माती व बर्फ वितळवू शकतात, असे नासाने स्पष्ट केलंय. सूर्याच्या आगीत आयोन्स आणि इलेक्ट्रॉन्स यांचं मिश्रण मोठय़ा प्रमाणावर असतं. भन्नाट वेगात असलेले हे घटक चंद्राच्या जमिनीवर आदळतात. त्यावेळी आयोन्स इलेक्ट्रिक लेअर्सच्या रूपात येतात, तर कठीण इलेक्ट्रॉन्स समूहाने येऊन आघात करतात. पॉझिटिव्ह आयोन्स आणि निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स यांच्या एकत्रीकरणामुळे धक्क्यांचं बळ वाढतं. परिणामी चंद्राचा पृष्ठभाग विरघळायला लागतो.

सौर वादळांमुळे ब्रह्मांडातील ग्रह, तारे विरघळणं हे काही नवीन नाही. ते होतच असतं. दोन ताऱयांची टक्कर होते तेव्हा एक तारा उद्ध्वस्त होतो. पण ज्या चंद्राच्या शीतलतेची, त्याच्या चमकदार रूपाची आपण तारीफ करतो तो चंद्रच या विरघळण्यात हरवून गेला तर काय करायचं? एकीकडे चंद्र नाहीतर मंगळावर राहायला जायची स्वप्न आपण पाहातोय. चंद्रच नाहिसा झाला तर आम्ही कोणाच्या तोंडाची उपमा द्यायची?

चंद्राच्या जन्माबाबत…

चंद्राचा कायम अंधारात असलेला भाग खूप महत्त्वाचा मानला जातो. ‘परमनंटली शॅडोड रिजन’ (पीएसआर) असं या भागाला म्हटलं जातं. ‘नासा’ने फंड उपलब्ध करून दिलेल्या ‘लुनार रिकन्सायन्स ऑर्बिटर’ या अंतराळ मोहिमेतून चंद्राच्या या अंधारातील भागाचा अभ्यास करण्यात आला. पीएसआरच्या अभ्यासामुळे चंद्राचा इतिहासच लोकांसमोर आला आहे. चंद्राची निर्मिती ४.५१ अब्ज वर्षांपूर्वी झाल्याचं आता उघड झालंय. यापूर्वी १९७१ साली ‘अपोलो-१४’ने केलेल्या संशोधनानुसार चंद्राची निर्मिती ६० दशलक्ष वर्षांपूर्वी झाल्याचे म्हटले जात होते.

 

आपली प्रतिक्रिया द्या