पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांची मॉप अप फेरी रद्द

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांची मॉप अप फेरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आली आहे. यामुळे दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश घेण्याची संधी मिळणार असल्याचे सीईटी सेलच्या वतीने सांगण्यात आले.

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या (एमडी/एमएस व पदविका) सुरु असलेल्या प्रवेशात 28 जानेवारीला पहिली यादी जाहीर झाली. यासाठी 1 हजार 865 जागा होत्या. यातील दुसऱ्या फेरीसाठी 414 जागा शिल्लक राहिल्या होत्या. या फेरीतील रिक्त जागांवर प्रवेश पूर्ण करण्यासाठी मॉप अप फेरी 26 मार्च रोजी जाहीर केली होती. मात्र या फेरीला विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यानुसार पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या दोन मुख्य फेऱ्या झाल्यानंतर आयोजित केलेली मॉप अप फेरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आली आहे. यामुळे दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश घेण्याची मुभा मिळाली आहे.

एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या दुसर्या फेरीनंतर आता 1 मॉप अप फेरी झाली. त्यानंतर मॉप अप फेरी ही केवळ शासकीय महाविद्यालयासाठी घेण्यात आली आहे. या फेरीची शेवटची तारीख 4 एप्रिल आहे. खासगी महाविद्यालयात रिक्त असलेल्या जागा या संस्था स्तरावर भरण्यासाठी या जागा महाविद्यालयास हस्तांतरित करण्यात आल्या असल्याची माहितीही सीईटी सेलने दिली आहे. बीडीएस अभ्यासक्रमासाठी 5 मार्च नंतर दुसरी मॉप अप फेरी जाहीर केली जाणार आहे. तसेच बीएएमएस, बीएचएमएस आणि बीयुएमएस अभ्यासक्रमासाठी 2 फेरी पूर्ण झाली असून ऑल इंडिया मॉप अप फेरी झाल्यानतंर राज्यातील कोटा भरण्यासाठी फेरी होणार आहे. यासाठी 8 मार्चनंतर एक फेरी होईल, असेही सीईटी सेलच्या वतीने सांगण्यात आले आहे.