रोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल!

प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

दररोज जास्त मद्यसेवन करणाऱ्या व्यक्तींचं आयुष्य घटत असल्याचं एका आरोग्यविषयक सर्वेक्षणातून समोर आलं आहे. लान्सेट येथे प्रकाशित झालेल्या या आरोग्यविषयक अहवालानुसार, ज्या व्यक्ती दररोज एका ग्लासाहून अधिक मद्यपान करतात, त्यांच्या आयुष्यात घट होत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे.

या अहवालासाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांनी वय वर्षे ३० ते १०० इतक्या वयोमानाच्या ६० हजार व्यक्तींच्या मद्यपानाच्या सवयींचा अभ्यास केला. यात वेगवेगळ्या १९ देशांमधील नागरिक होते. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, वैद्यकीय इतिहास, आजारपणं, राहणीमान, वय, लिंग अशा सगळ्यांच्या समावेश या अभ्यासात केला गेला. त्यातून हा निष्कर्ष समोर आला आहे की, दररोज १०० मिलिपेक्षा जास्त प्रमाणात अल्कोहोलचं सेवन करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात घट होते. अशा व्यक्ती इतर निर्व्यसनी किंवा कमी प्रमाणात मद्यसेवन करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत सहा महिने ते एक वर्ष कमी जगतात, असं समोर आलं आहे.

यामध्ये पोर्तुगाल, स्पेन, अमेरिका अशा देशांचे क्रमांक वरचे असून या देशातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे. तसंच या अहवालात विविध देशांतील ४० हजारांहून जास्त मृत्यू हे अतिरिक्त मद्यपानाने झाल्याचं नोंदवण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या