कोरोनाचे शिक्षणावर संकट, जगात 15.60 कोटी मुले शाळेत जाऊ शकत नाहीत!

कोरोना महामारीने जगातील शिक्षणावर मोठे संकट आणले आहे. लॉकडाऊन आणि अन्य निर्बंधांमुळे जगभरातील   सुमारे 15.60 कोटी मुले अद्यापि शाळेत जाऊ शकत नाहीत, तर सुमारे 2.5 कोटी मुले कधीच शाळेत परतणार नाहीत, अशी भीती संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अॅण्टोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केली आहे.

गुटेरेस यांनी सोशल मीडियावर म्हटले, ‘‘कोरोना काळात जग शिक्षणाच्या संकटातून जात आहे. शाळा बंद आहेत. आपल्याला डिजिटल शिक्षणाला चालना द्यावी लागेल. भविष्यात मुलांच्या शिक्षणाच्या कामी येईल अशी व्यवस्था तयार करावी लागेल.’’

‘युनिसेफ’चे प्रवक्ते जेम्स एल्डर यांनी सांगितले, ‘‘कोरोनात जगभरात 60 कोटी मुले शाळेत जाऊ शकली नाहीत. आशिया व प्रशांत क्षेत्रातील सुमारे 50 देशांत 200 दिवसांपासून शाळा बंद आहेत. दक्षिण अमेरिकेतील 18 देशांमध्ये पूर्णतः वा अंशतः शाळा बंद आहेत. पूर्व व दक्षिण आफ्रिकी देशांत 5 ते 18 वर्षांची 40 टक्के मुले शाळेत जाऊ शकत नाहीत. पूर्व आशिया व प्रशांत क्षेत्रातील आठ कोटी मुले शाळेपासून वंचित आहेत.

14 देशांमध्ये वर्षभर शाळा बंद

‘युनिसेफ’च्या ताज्या अहवालानुसार, मार्च 2020 ते फेब्रुवारी 2021पर्यंत जगातील 14 देशांमध्ये मोठय़ा प्रमाणात शाळा बंद होत्या. त्यात हिंदुस्थानचाही समावेश आहे. या काळात या देशातील 16.80 कोटी मुले शाळेत जाऊ शकली नाहीत. पनामात सर्वाधिक दिवस शाळा बंद राहिल्या. त्यानंतर बांगलादेशचा क्रमांक आहे. युरोप व उत्तर अमेरिकी देशांचा या अहवालात उल्लेख नाही.

लर्निंग पासपोर्ट तसेच रेडिओद्वारेही शिक्षण

युक्रेनसह अनेक देशांमध्ये ‘लर्निंग पासपोर्ट’द्वारे मुलांना ऑनलाइन शिकविले जात आहे. हा कार्यक्रम युनिसेफ, पेंब्रिज विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्टने मिळून तयार केला आहे. यात मुलांना शिक्षणासाठी ऑनलाइन पुस्तके, व्हिडीओ उपलब्ध केले जात आहेत, तर युनिसेफने जगात शंभरपेक्षा जास्त रेडिओ लिपी शोधल्या. या लिपींद्वारे मुलांना शिकविले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या