जगभरात 19 वर्षांत 2 हजार वाघांची शिकार, हिंदुस्थान आघाडीवर

276

जगभरात गेल्या 19 वर्षांत 2000 ते 2018 दरम्यान 32 देशांमध्ये तब्बल 1977 वाघांची शिकार झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे वाघांच्या शिकारीत हिंदुस्थान आघाडीवर असून वाघाच्या विविध अवयवांसाठी देशात 19 वर्षांत 626 वाघांची शिकार करण्यात आली. केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रफिक इंटरनॅशनल या एनजीओच्या सर्व्हेतून ही माहिती पुढे आली आहे.

ट्रफिक इंटरनॅशनल ही स्वयंसेवी संस्था जगभरातील प्राणी वाचवण्यासाठी तसेच जैवविविधता टिकवण्याच्या दृष्टीने काम करते. या संस्थेने जगभरात आतापर्यंत किती वाघांची शिकार झाली याबाबतचा अहवाल तयार केला आहे.

हिंदुस्थानात सर्वाधिक वाघ
जगभरातील 3951 वाघांच्या तुलनेत हिंदुस्थानात सर्वाधिक म्हणजेच 2967 वाघ आहेत. म्हणजेच हिंदुस्थानात वाघांची संख्या 75.09 टक्के इतकी आहे. देशात वाघांच्या शिकारीची तब्बल 463 प्रकरणे उघडकीस आली आहेत. दरम्यान, अनेक ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये तब्बल 1,142 वाघांची शिकार झाल्याचे समोर आले आहे.

शिकाऱ्यांवरील कारवाईत हिंदुस्थान आघाडीवर
वाघांच्या शिकारीत जगभरात हिंदुस्थान क्रमांक एकवर असून शिकाऱ्यांवरील कारवाईतही आघाडीवर आहे. वाघांच्या अवयवांच्या जप्तींमध्ये सर्वाधिक 38.4 टक्के प्रकरणे हिंदुस्थानातील आहेत. जगभरात आतापर्यंत वाघांची शिकार करण्याप्रकरणी 1,167 जणांना अटक करण्यात आली आहे.

वाघांच्या शिकारीत थायलंडचा दुसरा क्रमांक लागतो. या देशात वाघांच्या शिकारीची 49 प्रकरणे उघडकीस आली असून 369 वाघांची शिकार झाली. इंडोनेशिया तिसऱ्या क्रमांकावर असून या देशात 119 प्रकरणांमध्ये 266 वाघांची शिकार झाल्याचे उघड झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या