एका दिवसात 2423 काँडोम घरपोच करणाऱ्या ‘स्विगी’च्या ट्विटवर भन्नाट प्रतिक्रिया

29 मे रोजी चेन्नई सुपरकिंग्ज आणि गुजरात टायटन्स या संघांमध्ये आयपीएलचा अंतिम सामना झाला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना बराच लांबला होता. मात्र ज्यांनी अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना पाहिला त्यांना एका चित्तथरारक सामन्याचा अनुभव घेता आला. अंतिम सामन्याच्या दिवशीच मैदानाबाहेरही काही विक्रम रचले जात होते.

यंदाच्या संपूर्ण आयपीएल मोसमात दर मिनिटाला 212 बिर्याणींची ऑर्डर दिली जात होती. यंदाच्या मोसमात स्विगीने 1.2 कोटी बिर्याणीचे पॅक घरपोच केल्याचं म्हटलं आहे. बिर्याणी हाच या काळात सर्वात जास्त मागवला गेलेला पदार्थ होता असं स्विगीने म्हटलं आहे. जर 1 शाकाहारी बिर्याणी मागवली जात होती तर त्याचवेळी 20 मांसाहारी बिर्याणींची ऑर्डर दिली जात होती असंही स्विगीने म्हटलं आहे. स्विगीवरून सामान किंवा खाद्यपदार्थ ऑर्डर करणाऱ्यांना त्यांच्या वस्तू घरपोच करण्यासाठी स्विगीच्या घरपोच सेवा सहाय्यकांनी 33 कोटी किलोमीटरचं अंतर कापलं आहे.

29 मे रोजी स्विगीने एक ट्विट केलं होतं, ज्यात त्यांनी म्हटलं होतं की अंतिम सामन्याच्या दिवशी स्विगीवरून 2423 काँडोमची पाकीटं घरपोच मागवण्यात आली होती. यावर स्विगीने ट्विट करत म्हटलं होतं की आज 22 खेळाडूंपेक्षा जास्त खेळाडू दिसतायत.

यावर लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील काही निवडक प्रतिक्रिया खालीलप्रमाणे आहेत.