
बांगलादेशात आरक्षण वादाचा भडका उडाल्यानंतर तेथील सरकारने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्वत्र लष्कर तैनात केले आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून संचारबंदीची घोषणा केली आहे. याचदरम्यान बांगलादेशमध्ये अडकलेल्या 400 हून अधिक हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
सरकारी नोकरीतील आरक्षणाविरोधातील आंदोलन हिंसक बनले आहे. त्यामुळे सरकारने प्रतिबंधात्मक कठोर पावले उचलली आहेत. हिंसाचारामध्ये किमान 105 नागरिकांचा मृत्यू झाला असून 1500 हून अधिक जण जखमी झाले आहेत. सरकारी नोकरीतील आरक्षणाला तीव्र विरोध करीत विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. राजधानी ढाकासह इतर शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. याच आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांकडून दगडफेक तसेच जाळपोळ करण्याच्या घटना घडल्या आहेत.