वंदेभारत अभियानांतर्गत  मुंबईत आले तब्बल 57 हजारांहून अधिक नागरिक 

792
mumbai-airport

वंदेभारत अभियानांतर्गत मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा ओघ सातत्याने सुरुच आहे. आतापर्यंत  419 विमानांनी तब्बल 57 हजार 362 प्रवासी मुंबई विमानतळावर उतरले आहेत. 31 ऑगस्ट पर्यंत आणखी 54 विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे. आलेल्या एकूण प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या 19 हजार 383, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 19 हजार 570 आणि इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 18 हजार 409 आहे.

कोरोना विषाणुविरुद्ध शासन निग्रहाने लढत असतांना परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याची जबाबदारी महाराष्‍ट्र शासनामार्फत पार पाडली जात आहे.

आलेल्या प्रवाशांचे क्वारंटाईन

बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याचे काम  जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.

महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन,  मदत आणि पुनर्वसन विभाग यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे. इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे तसेच या प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे. वंदेभारत अभियानातील कामकाज जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर,बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रादेशिक  परिवहन अधिकारी, बेस्ट, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ, भारतीय विमानतळ प्राधीकरण,  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण लि.   यांच्या समन्वयाने केले जात आहे.  वंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या