आतापर्यंत आठ हजार गणेशभक्तांकडून एसटीची तिकिटे आरक्षित

480
file photo

कोकणात जाण्यासाठी गणेश भक्तांची लगबग वाढली असून आतापर्यंत आठ हजार जणांनी एसटी बसेसची तिकीटे आरक्षित केली आहेत. कोकणात गणेशोत्सवासाठी रविवारी 70 एसटी बसेस रवाना होत आहेत. आतापर्यत 30 बसेसचे ग्रुप बुकींग फुल झाले आहे. एसटीने कोकणात जाण्यासाठी कोणताही ई-पास आवश्यक नसल्याने चाकरमानी एसटी प्रवासाला प्राधान्य देत आहे. खाजगी बसेसचे दर प्रति सीट अडीच हजार रूपयांच्या पुढे गेले आहेत.

दहा दिवसांचे क्वारंटाईनची अट पाहता आता गणेशोत्सवाला कोकणात जाण्यासाठी 12 ऑगस्ट ही शेवटची तारीखजवळ येईल तशी एसटीला जादा प्रतिसाद मिळत आहे. एसटीचे तिकीट सातशे ते आठशे रूपयांच्या घरात आहे. रेल्वेचे तिकीट सर्वात कमी असले तरी रेल्वेचे नियोजन सोमवारनंतर असल्याने भक्तांनी एसटीकडे आपला मोर्चा वळविला आहे. दरम्यान, एसटीच्या परतीच्या प्रवासाचे देखील आरक्षण सुरू झाले आहे.

कोकणात गणपतीला जाण्यासाठी 11 आणि 12 ऑगस्ट रोजी सर्वाधिक आरक्षण झाले आहे. दहा दिवसांच्या क्वारंटाईनची अट पाळण्यासाठी 12 ऑगस्टपूर्वी पोहचण्याचा अनेकांचा प्रयत्न असून त्यासाठी आरक्षणाची धडपड सुरू आहे. आतापर्यंत 8000 चाकरमान्यांनी एसटीचे आरक्षण केले आहे. कोकणात जाणाऱयांसाठी 10 दिवस क्वारंटाईनची अट आहे. त्यामुळे 12 ऑगस्टपूर्वी कोकणात पोहोचावे लागेल. जे गणेशभक्त 12 तारखेनंतर जातील त्यांना 48 तासांपूर्वी कोरोना चाचणी करायची आहे. ती निगेटिव्ह आली तरच 12 तारखेनंतरही प्रवासाची परवानगी मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या