कपिल शर्मा, इरफान खानविरोधात न्यायालयीन कारवाईच्या हालचालींना सुरुवात

मुंबई : अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि अभिनेता इरफान खान यांच्याविरोधात न्यायालयीन कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. गोरेगाव येथील डीएलएच एन्क्लेव्ह इमारतीतील फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी त्यांच्यावर ओशिवरा पोलिस ठाण्यात मुंबई महापालिकेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कपिल आणि इरफान दोघेही एकाच बिल्डींगमध्ये राहतात. दोघांवरही एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

डीएलएच एन्क्लेव्ह ही ११ मजले असलेली इमारत गोरेगाव पश्चिमेला आहे. याच इमारतीच्या ९व्या मजल्यावर कपिल शर्मा तर, पाचव्या मजल्यावर इरफान खान यांचा फ्लॅट आहे. दोघांनीही फ्लॅटचे स्ट्रक्चर बदलून अनधिकृत बांधकाम केले आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणी महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने पाच लाख रूपये मागितल्याचे सांगत हेच का तुमचे अच्छे दिन असे कपिलने ट्विट केले होते. कपिलने हे ट्विट करून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टॅग केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती.

कपिल शर्मा याने खाडीतील तिवरांची कत्तल करून जागा हडप केल्याच्या प्रकरणाची वन विभागाने गंभीर दखल घेतली असून त्या जागांची पाहणीही केली आहे. अंधेरीच्या एसव्हीपी नगरमध्ये म्हाडाचे रो-हाऊस आहेत. या ठिकाणी कपिल शर्मासह अनेक सेलिब्रिटीज राहतात. या रो-हाऊसच्या मागे असलेल्या खाडीतील तिवरांची कत्तल करून शर्मा याच्यासह अनेक सेलिब्रिटीजनी भराव टाकला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या