धोक्याची घंटा! नोकऱ्यांवरील संकटामुळे लाखो कर्मचाऱ्यांनी पीएफमधून रक्कम काढली

1983
epfo-pic

कोविड -19 ने जगभरात अनपेक्षित असे आर्थिक संकट निर्माण केले आहे. याचाच गंभीर परिणाम हिंदुस्थानात देखील पाहायला मिळत आहे. अनेकांच्या पगाराच्या रकमेत कपात झाली आहे किंवा थेट नोकरी गेल्याने नुकसान झाले आहे. सरासरी तीन आठवड्यात दिवसाला सुमारे 1लाख लोकांनी त्यांच्या अधिकृत सेवानिवृत्तीच्या रकमेला हात घातला आहे. यामुळे देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणखी जास्त वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रोव्हिडंड फंड हा कर्मचार्यांआचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाचा असतो. पण अनेक कामगार आणि कर्मचाऱ्यांचे वर्तमानच धोक्यात आल्याने त्यांनी हा निधी वापरण्यास सुरूवात केली आहे.
कोविड 19 मुळे अनेक प्रस्थापित कंपन्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून कॉस्ट कटिंग करत त्यांनी कर्मचारी कपात केली आहे. तर दुसऱ्या बाजूला संथ गतीने नवीन रोजगार निर्माण होत आहेत. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे, असे मिंटच्या वृत्तात म्हटलं आहे.

1 एप्रिलपासून 50 लाखांहून अधिक कामगारांनी आपल्या कर्मचार्यांेच्या भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) खात्यातून पैसे काढले आहेत, असे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. या आकडेवारीनुसार, निवृत्तीवेतन निधी व्यवस्थापकाद्वारे या आथिर्क वर्षात सुमारे 15 हजार कोटी रुपयांचे 50 लाखांहून अधिक दावे निकाली काढण्यात आले आहेत.

9 जून ते 29 जून या कालावधीत जवळपास 20 लाख लोकांनी आपल्या पीएफ खात्यातून पैसे काढले आहेत. ही वस्तुस्थिती असे दर्शवते की सरकारने लॉकडाऊनवरील निर्बंध केल्यानंतरही देशातील पगारदार वर्गाचा त्रास कायम आहे.

एप्रिलपासून एकूण पैसे काढणाऱ्यांपैकी जवळपास 60% टक्के रक्कम ही कोरोनाशी निगडित नसल्याची माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. लॉकडाऊन कालावधीत कोरोना संबंधित पैसे काढणे ही सोय ईपीएफओच्या ग्राहकांना मदत करण्यासाठी तात्पुरती उपाय म्हणून तयार केली गेली होती, परंतु कोविडशी निगडित नसताना देखील पैसे काढणे नोकऱ्यांवरील संकट आणि पगार कपात हे स्पष्टपणे दर्शवित असल्याचे बोलले जात आहे.

महिन्याला 15 हजाराहून कमी पगार असलेल्या व्यक्तींना कोरोना काळात मिळालेली आगावू रक्कम मोठा आधार ठरत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या रक्कमेमुळे अनेक लोक कर्जबाजारी होण्यापासून वाचतील असेही ईपीएफओच्या निवेदनात म्हटले होते.

EPFO

या आधी केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या अखत्यारीतील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO ने कोरोनाशी लढा देण्याच्या कार्यात लाभार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी EPF म्हणजे भविष्य निर्वाह निधीच्या नियमात दुरुस्ती करुन, विशेष तरतुदीअंतर्गत, देशभरातील सुमारे 1.37 लाख दावे त्वरित म्हणजे 10 दिवसांच्या आत निकाली काढले आणि 279.65 कोटी रुपयांचा निधी वितरीत केला होता. 10 एप्रिल 2020 च्या पत्रकात ही माहिती देण्यात आली होती.

या निधीचे वितरण देखील सुरू झाले आहे. सध्या या प्रणालीअंतर्गत केवायसी पूर्ण असलेल्या सर्व दाव्यांची पडताळणी केवळ 72 तासात केली जात आहे. ज्या सदस्यांनी इतर कोणत्या कारणासाठी हा निधी काढण्याचा दावा केला आहे, ते देखील, या आजाराच्या मुकाबल्यासाठी नव्याने दावा करु शकतात. प्रत्येक सदस्याच्या दाव्याची केवायसी नियमांना अनुसरुन ते दावे त्वरित निकाली काढले जात आहे.

कोविड-19 च्या आजाराचा सामना करण्यासाठी सरकारने ईपीएफ योजने अंतर्गत पैसे काढण्याची विशेष तरतूद केली आहे. ही तरतूद पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा भाग असून, यासंदर्भात 28 मार्च 2020 रोजी अधिसूचना जरी करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार, तीन महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता याची मर्यादा निश्चित करण्यात आली असून या खात्यात जमा असलेल्या एकूण रकमेपैकी 75 टक्यांपर्यतची रक्कम दिली जाते. ही आगावू रक्कम असल्याने या रकमेवर कर कापला जात नाही.

या रकमेची मागणी होऊ शकेल, याचा अंदाज घेऊन EPFO ने एक नवे सॉफ्टवेयर विकसित केले आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रकिया जलद आणि कागदरहित होऊ शकते. मात्र, हे दावे निकाली काढण्यासाठी, सदस्याचे खाते केवायसी संपूर्ण असणे आवश्यक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या