EMI स्थगितीला 3 महिन्यांच्या मुदतवाढीची RBIची सूचना

1757

देशातील कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता, लॉकडाऊनचा कालावधीही वाढवण्यात आलेला आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरही अत्यंत वाईट परिणाम झाला आहे. देशात अनेक जण बेरोजगार झाले असून काहींना उद्योगधंद्यात मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी बँकांनी कर्जधारकांवर कर्जाच्या हफ्त्यासाठी आणखी 3 महिने दबाव टाकू नये, त्यांना दिलासा द्याव्या असं म्हटलं आहे. बँकांनी जर रिझर्व्ह बँकेचे ऐकले तर त्या ग्राहकांकडून 1 जून 31 ऑगस्ट या कालावधीमध्ये कर्जाच्या हफ्ते वसूल केले जाणार नाही.

लॉकडाउनमध्ये उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने रिझर्व्ह बँकेने तीन महिन्यांसाठी कर्जाच्या हप्त्यांना स्थगिती देण्याचे बँकांना सुचवले होते. त्यानुसार बँकांनी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात कर्जाचा हप्ता स्थगित केला होता. मात्र अजूनही लॉकडाउनमध्ये वाढ होत असल्याने बँक ग्राहकांच्या कर्जाचे हप्ते स्थगितीचा कालावधी वाढवला जाईल असे आधीपासून बोलले जात होते. ही शक्यता शक्तिकांता दास यांनी खरी ठरवली. दास यांच्या सूचनेनंतर बँकांकडून पुन्हा निर्णय घेण्यात आल्यास जून, जुलै आणि ऑगस्ट असे आणखी तीन महिने कर्जदारांना ‘ईएमआय स्थगिती’ मिळेल.

शक्तिकांता दास यांनी शुक्रवारी सादर केलेल्या निवेदनामध्ये रेपो रेटमध्ये आणखी कपात करत असल्याची घोषणा केली. त्यांनी रेपो रेट 4.4 टक्क्यांवरून 4 टक्के इतका केला जात असल्याचे सांगितले आहे. यामुळे सर्व प्रकारची कर्जे आणखी स्वस्त होणार आहेत. ही घोषणा केल्यानंतर त्यांनी सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय असलेल्या EMI बाबतही बँकांना सूचना केली. यामुळे सार्वजनिक बँका, सहकारी बँका, राष्ट्रीय स्तरावरील वित्तीय संस्था आणि इतर वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था या सर्वांना ठरावीक मुदतीच्या गृह आणि वाहन कर्जासह सर्व कर्जांवर पुढील तीन महिन्यांसाठी कर्जहप्त्यावर स्थगिती देण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही केवळ सूचना असून रिझर्व्ह बँकेने यासाठी बंधन घातलेले नाही. कर्जाच्या हप्त्यांना जरी स्थगिती मिळाली तरी त्यावरील व्याज आकारणी थांबणार नाही

आपली प्रतिक्रिया द्या