तारण मालमत्ता विकणाऱ्या बँक अधिकाऱ्यांसह विकत घेणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा

सामना प्रतिनिधी । खेड

कर्ज घेताना बँकेकडे तारण ठेवलेली मालमत्ता कर्जदाराला अंधारात ठेवून परस्पर विकणाऱ्या बँक अधिकाऱ्यांसह सहाजणांविरोधात खेड पोलिसांनी संगनमताने चोरी, अपहार, बनावट दस्तावेज तयार करणे या आरोंपाखाली गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी ही कारवाई केली.

खेड तालुक्यातील चिंचघर प्रभुवाडी येथील मयूर पायरे दाम्पत्यांनी 2006 साली बॅंक ऑफ इंडियाच्या खवटी शाखेकडून 10 लाख रुपयांचे तारण कर्ज घेतले होते. या कर्जाचे हप्ते पायरे यांच्याकडून नियमितपणे भरले जात होते. 2011 साली व्यवसायांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेऊन पायरे पतीपत्नी यांनी त्यांची जमीन औद्योगिक बिनशेती करून घराच्या तळमल्यावर काजू प्रक्रिया उद्योग सुरु करणयचा निर्णय घेतला.

या व्यवसायासाठी त्यांनी पुन्हा बँक ऑफ इंडियाच्या खवटी शाखेकडेच कर्ज मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पायरे यांच्या अर्जानुसार बँकेने त्यांना 23 लाख 27 हजार 500 रुपयांचे कर्ज मंजूर केले. या कर्जाला 8 लाख 57 हजार 500 रुपये इतकी सबसिडीही होती. मात्र बँकेने मंजूर केलेल्या कर्जाची रक्कम पायरे यांना वेळेत दिली गेली नाही. सुरवातीला बँकेने केवळ 5 लाख रुपये पायरे यांना दिले. यामध्ये यंत्र खरेदी करणे, शेड उभारणे आणि कच्चा माल खरेदी करणे शक्य न झाल्याने पायरे यांच्या व्यवसायाचे गणित फसले आणि त्यांना या व्यवसायात फार मोठे नुकसान सहन करावे लागले.

व्यवसायासाठी मंजूर झालेले कर्ज पायरे यांना वेळेत मिळाले असते तर त्यांना या व्यवसायात चांगल्या प्रकारे जम बसवता आला असता आणि बॅंकेचे हप्तेही वेळेत फेडता आले असते मात्र बँकेने मंजूर झालेली कर्जाची रक्कम पायरे यांना वेळेत न दिल्याने व्यवसायात नुकसान झाले. हे नुकसान केवळ बँकेच्या निष्काळजीपणामुळे झाले आणि पायरे यांच्याकडून कर्जाचे हप्ते थकले.

आपल्याकडून कर्जाचे प्ते थकले आहेत याची पायरे यांना जाणीव असल्याने त्यांनी बँकेच्या व्यवस्थापकांना पत्र पाठवून कर्जाचे थकलेले हप्ते भरण्याची तयारी दाखवली. मात्र बँक व्यवस्थापनाने पायरे यांना नियमित हप्ते लावून देण्याबाबत सहकार्य केले नाही. उलटउपक्षी बँकेचे क्षत्रिय प्रबंधक सुदीप नियोगी, विभागीय व्यवस्थापक रामधन कुंभार, तत्कालीन शाखाधिकारी अविनाश अडसर, यांनी संगनमतांने 2 एप्रिल 2016 रोजी पायरे यांनी कर्ज घेताना तारण दिलेली मालमत्ता लिलाव प्रक्रियेद्वारे विक्री करत असल्याचे नोटीस पायरे यांना बजावली.

या नोटीसीला उत्तर देताना पायरे यांनी कर्जाची थकीत रक्कम आपण तात्काळ भरण्यास तयार असल्याचे लेखी कळवून तारण असलेल्या कोट्य़ावधी रुपयांचा मालमत्तेची लिलावाद्वारे विक्री करू नये, अशी विनंती केली. मात्र बँकेने पायरे यांची ही विनंती धुडकावून पायरे यांची कोट्य़ावधीची मालमत्ता गजेंद्र विठ्ठलदास खेडेकर या पार्टीला लिलावाद्वारे विकली. नियमानुसार तारण असलेली मालमत्ता विकण्याआधीच बँकेने त्या मालमत्तेचा कायदेशिररित्या ताबा घेणे आवश्यक होते मात्र तसे न करता बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्या मालमत्तेचा लिलाव केला.

त्यानंतर बँकेचे अधिकारी आणि मालमत्ता खरेदी करणारे खेडेकर यांनी पायरे यांच्या घरात घुसखोरी करून घरातील सुमारे 25 ते 30 लाख रुपये किमतीचे साहित्य लांबविले. या घुसखोरीमुळे बेघर झालेल्या पायरे दाम्पत्यांने प्रातांधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले. यावेळी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. मात्र दिलेले आश्वासन पाळले न गेल्याने मयुर पायरे यांनी अखेर न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाने या प्रकरणी योग्य तो निर्णय घेत बँकेचे क्षत्रिय प्रबंधक सुदीप नियोगी, विभागीय व्यवस्थापक रामधन कुंभार, तत्कालीन शाखाधिकारी अविनाश अडसर, खवटी शाखेचे शिपाई अनंत दळवी व लिलावाची मालमत्ता खरेदी करणारे मुंबईस्थित गजेंद्र खेडेकर या सहाजणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार खेड पोलिसांनी तात्काळ वरील सहाजणांवर संगममताने चोरी करणे, अपहार करणे, बनावट कागदपत्र तयार करणे, या आरोपांखाली गुन्हे दाखल केले.

या प्रकरणी खेड पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक अनिल गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक बाबुराव धालवलकर अधिक तपास करत आहेत.