३५३ वर्षांनी मोरयाच्या धोंड्याचे पहिले शासकीय पूजन

44
दांडी वायरी किनाऱ्यावरील मोरयाचा धोंडा चे पूजन करताना अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, सोबत गुरुनाथ राणे, दत्तात्रय नेरकर व इतर. (अमित खोत)

सामना प्रतिनिधी । मालवण

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दांडी- वायरी किनार्‍यावरील ‘मोरयाचा धोंडा’ च्या ३५३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येथे प्रथमच प्रेरणोत्सव समिती व मालवण नगरपालिका यांच्या सहकार्यातून शनिवारी शासकीय पूजन करण्यात आले. जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते मोरयाचा धोंडाचे पूजन व जलपूजन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी सागरी मार्गांने देशावर होणारे आक्रमण लक्षात घेऊन गड-किल्ल्यांची साखळी उभी केली. त्यापैकी एक व महाराज्यांच्या स्वराज्याची सागरी राजधानी असणाऱ्या किल्ले सिंधुदुर्गच्या बांधकामाचे भूमिपूजन ज्या ठिकाणी झाले त्या ‘मोरयाच्या धोंड्या’चे पहिले शासकीय पूजन करण्याचा मला मिळालेला मान हे माझे भाग्य आहे. असे प्रतिपादन यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक प्रकाश गायकवाड यांनी केली.

दरम्यान, आजही देशाला समुद्र मार्गे धोका असून शिवरायांचा दुरदृष्टिकोन समोर ठेवून आम्हा पोलीस व सर्व शासकीय यंत्रणेसोबत सर्वांनी शिवरायांचे मावळे बनून सागरी सुरक्षा करूया. असेही गायकवाड यांनी सांगितले.

मालवण पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, नायब तहसीलदार सुहास खडपकर, प्रेरणोत्सव समिती अध्यक्ष गुरुनाथ राणे, उपाध्यक्ष ज्योती तोरसकर, सचिव विजय केनवडेकर, डॉ. सुभाष दिघे, मोरयाचा धोंडा साठी अहोरात्र मेहनत घेणारे दत्तात्रय नेरकर, पालिकेचे आरोग्य सभापती आपा लुडबे, किल्ला रहिवाशी श्री. भोसले, नगरसेवक गणेश कुशे, नगरसेविका सेजल परब, तृप्ती मयेकर, पूजा करलकर, सुनीता जाधव, आकांक्षा शिरपुटे, प्रदीप वेंगुर्लेकर, भाऊ सामंत, महेश सामंत, संजय गावडे, रविकिरण आपटे, रवी तळाशीलकर, मुकेश बावकर, चांदेरकर, दत्तप्रसाद पाटकर, एस. एस. परूळेकर,भाऊ हडकर, वैशाली शंकरदास, साईनाथ गोसावी, आनंद तोंडवळकर, अविनाश मालवणकर, ढोले बाबू,. एम.एस. वालकर, शांती पटेल, सुधीर गोसावी, दशरथ कवटकर आदी व इतर शिवप्रेमी या प्रसंगी उपस्थित होते.

शासकीय पूजन झाल्यानंतर मर्दानी खेळ तसेच ऐतिहासिक ‘किल्ले सिंधुदुर्ग’ व ‘मोरयाचा धोंडा’ यावर मार्गदर्शन केले गेले. स्वागत दत्तात्रय नेरकर यांनी केले. सूत्रसंचालन ज्योती तोरसकर यांनी केले तर आभार विजय केनावडेकर यांनी मानले.

मोरयाचा धोंडा हा भाग ग्रामपंचायत वायरी भूतनाथ गावामध्ये येत असल्याचे वायरी ग्रामपंचायतीने सांगत प्रेरणोत्सव समिती मोरयाचा धोंडा व सिंधुदुर्ग किल्ला वायरी भूतनाथ गावापासून तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर आज प्रेरणोत्सव समितीच्या व नगरपालिकेच्या सहकार्यातून मोरयाचा धोंडा येथे शासकीय पूजा करण्यात आली. मात्र पूजन विनासायास पार पडले.

आपली प्रतिक्रिया द्या