जगातला सगळ्यात मौल्यवान बाप्पा पाहिलात का?

सामना ऑनलाईन । सुरत

भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या गणपती बाप्पांच्या अनेक सुंदर आणि मौल्यवान मूर्ती तुम्ही पाहिल्या असतील. मात्र, जगातला सगळ्यात मौल्यवान गणपती बाप्पा पाहिलात का? सुरत येथील हिरेव्यापारी कनुभाई आसोदरिया यांच्या घरच्या गणपती बाप्पा जगातला सगळ्यात मौल्यवान बाप्पा म्हणून नोंदवला गेला आहे. कनुभाई यांच्याकडे तब्बल १८२.३ कॅरटची ३६.५ ग्रॅम वजनाची हिऱ्याची गणेशमूर्ती आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती स्वयंभू आहे.

कनुभाई सांगतात की, १२ वर्षांपूर्वी बेल्जियममधून त्यांच्याकडे आलेल्या कच्च्या पैलूरहित हिऱ्यांमध्ये हा हिरा होता. नीट निरखून पाहिल्यावर त्याला नैसर्गिकरित्या गणेशाचा आकार आल्याचं कनुभाईंच्या लक्षात आलं. म्हणून कनुभाईंनी बाप्पाच्या त्या स्वयंभू मूर्तीला देव्हाऱ्यात ठेवलं. कनुभाईंसाठी ही मूर्ती त्यांचं आराध्य दैवत आहे, त्यामुळे त्याची किंमत करणं त्यांच्यासाठी अशक्य आहे. मात्र, ही मूर्ती पाहिलेले अनेक जवाहिर या गणेश मूर्तीची किंमत सुमारे ६०० कोटी असल्याचं सांगतात. जवाहिरांच्या म्हणण्यानुसार, बाजारभावाप्रमाणे ही मूर्ती कोहिनूर हिर्‍यापेक्षाही महाग आहे. कोहिनूर हिरा १०५ कॅरेट वजनाचा आहे तर ही मूर्ती १८२.३ कॅरट वजनाची आहे.

कनुभाईंना ही मूर्ती विकण्यासाठी अनेक ऑफर्स आल्या. मात्र, त्यांनी ही मूर्ती विकणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. देशविदेशातून अनेक मान्यवर या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी सुरतला येऊन गेल्याचेही कनुभाई सांगतात.