वाहन दंडाची भीती! हट्टी मुलाला पालकांनी केले घरात कैद

640

नवीन मोटार वाहन कायदा देशात लागू झाला असून कायदा मोडल्यास मोठी रक्कम दंडाच्या स्वरूपात भरावी लागत आहे. याच भीतीने उत्तर प्रदेशमधील एका दाम्पत्याने आपल्या अल्पवयीन मुलाला काही तास घरात कोंडल्याची घटना घटना समोर आली आहे. वडिलांनी नवीन दुचाकी विकत घेतली होती आणि ही दुचाकी चालवण्यासाठी हा मुलगा हट्ट करत होता. अखेर मुलाने पोलिसांना फोन केला आणि पोलिसांनी येऊन त्याला आईवडिलांच्या कैदेतून सोडवले.

ही घटना आग्रामधील शाहदरा परिसरातील आहे. येथील रहिवासी धर्म सिंह यांनी 12 ऑगस्ट रोजी नवीन दुचाकी खरेदी केली. त्याचा 16 वर्षाचा मुलगा अधूनमधून ही दुचाकी चालवत होता. परंतु नवीन नियमांनुसार भरमसाठ दंडाची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर, दंडाच्या भीतीने धर्म सिंहने आपल्या मुलाकडून दुचाकीची चावी परत घेतली.

याबद्दल सांगताना धर्म सिंह म्हणाले आहेत की, मला समजले की नवीन मोटार वाहन कायद्यांतर्गत अल्पवयीन मुलाला वाहन चालविताना पकडले गेले, तर वाहन मालकाला दंड म्हणून 25,000 रुपये भरावे लागतील. म्हणून मी माझ्या मुलाकडून दुचाकीची चावी परत घेतली. मात्र तो दुचाकी चालवण्यासाठी हट्ट करू लागला. कोणताही उपाय शिल्लक न राहिल्याने त्याला खोलीत बंद करावे लागले.

मिळालेल्यात माहितीनुसार, स्वतःला घरातून बाहेर काढण्यासाठी मुलाने पोलिसांना फोन केला. मुलाच्या म्हणण्यानुसार, माझ्या पालकांनी माझ्याकडून दुचाकीची चावी परत घेतली आणि मला ती चालून देत नव्हते. शेवटी, माझ्या पालकांच्या कैदेतून मुक्त होण्यासाठी मला पोलिसांना फोन करावा लागला. पोलीस अधिकारी उदयवीर सिंह मलिक यांनी सांगितले की, आम्ही या कुटुंबीयांना ताकीद देऊन सोडले आहे आणि मुलाला त्याच्या आईवडिलांचे म्हणणे ऐकण्यास सांगितले. दरम्यान, उत्तरे प्रदेशमध्ये अद्याप नवीन मोटार वाहन कायदा लागू झाला नसून अजूनही जुन्याच नियमाप्रमाणे दंड वसूल केला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या