कलियुगातून सत्ययुगात पुन्हा जन्माला येतील! अंधश्रद्धाळू मुख्याध्यापक दांपत्याने केली पोटच्या मुलींची हत्या

एका दांपत्याने अंधश्रद्धेपोटी आपल्याच दोन मुलींची हत्या केल्याची भयंकर घटना आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात घडली आहे. गंभीर म्हणजे या घटनेतील आई आणि वडील हे दोघेही सुशिक्षित असून मुख्याध्यापक म्हणून काम करतात.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मृत्यू पावलेल्या दोन्ही तरुणींची नावं अलेख्या (27) आणि साई दिव्या (22) अशी आहेत. हे कुटुंब मदनापल्ले येथे राहतं. या दोघांचेही आई वडील पद्मजा आणि पुरुषोत्तम नायडू हे दोघेही मुख्याध्यापक म्हणून काम करतात. या दोन्ही मुली देखील सुशिक्षित होत्या आणि लॉकडाऊनमुळे घरी परतल्या होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कुटुंबात लॉकडाऊन दरम्यान काहीतरी बिनसलं होतं. रविवारी या कुटुंबाच्या घरातून किंकाळ्या ऐकू आल्या. त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केलं.

पोलिसांनी घरात घुसायचा प्रयत्न केला तेव्हा या दांपत्याने त्यांना रोखलं. पण, त्यांना बाजूला करत पोलीस घरात शिरले. तेव्हा आत दिसलेला प्रकार पाहून ते सुन्न झाले. त्यांच्या घरातील देवघर असलेल्या खोलीत आणि अजून एका खोलीत या दोन्ही मुलींचे मृतदेह पडले होते. दोन्ही मृतदेहांवर लाल कापड पांघरण्यात आलं होतं. त्यांच्या डोक्यावर व्यायाम करण्याच्या डम्बेल्सचा प्रहार करण्यात आला होता.

या दांपत्याच्या चेहऱ्यांवर मात्र अपराधीपणाचा लवलेशही नव्हता. पोलिसांनी त्यांना याची विचारणा केली तेव्हा या दोघांनी त्यांना सांगितलं की या दोन्ही मुली सूर्योदयापर्यंत जाग्या होती. कारण, उद्याच्या सूर्योदयासोबत कलियुग संपेल आणि सोमवारपासून सत्ययुगाचा आरंभ होईल, असं स्पष्टीकरण पोलिसांना या दांपत्याने दिलं. या प्रकरणी पोलिसांनी दांपत्याला बेड्या ठोकल्या असून मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या