कुत्र्याला घराबाहेर काढलं म्हणून मुलीची आईविरुद्ध तक्रार

977
dog
प्रातिनिधिक फोटो

घरात पाळीव प्राणी असावा, अशा मताचे अनेक जण असतात. पण ही कल्पना अनेक जण प्रत्यक्षात आणू शकत नाहीत, कारण घरच्या मोठ्या माणसांची भीती. कारण, यासाठी बऱ्याचदा घरच्या मोठ्यांची त्यातही विशेषतः घरच्या कर्त्या स्त्रीची परवानगी नसते. अशाच एका प्रकरणामध्ये घरच्या पाळीव कुत्र्याला घराबाहेर काढलं म्हणून एका तरुणीने आईविरुद्ध पोलिसात तक्रार केली आहे.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, घाटकोपर येथील पंतनगरमध्ये राहणाऱ्या या तरुणीचं नाव स्नेहा निकम असं आहे. स्नेहाला जानेवारी महिन्यात एक आजारी अवस्थेतलं कुत्र्याचं पिल्लु सापडलं होतं. तिने त्या पिल्लाला घरी आणून त्याची शुश्रुषा केली. ते पिल्लू मादी असल्याने तिने तिचं नाव कुकी ठेवलं होतं. सप्टेंबर महिन्यात 6 तारखेला पहाटे स्नेहाच्या आईने तिला उठवलं आणि कुकी नैसर्गिक विधीसाठी त्यांच्या इमारतीच्या आवाराबाहेर गेल्याचं आणि त्यानंतर गायब झाल्याचं सांगितलं. स्नेहाने सोसायटीच्या गेटबाहेर जाऊन कुकीचा शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही.

कुकी इमारतीबाहेर कशी गेली याचा शोध घेण्यासाठी स्नेहाने सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा तिला तिची आईच कुकीला गेटबाहेर सोडून येत असल्याचं दिसलं. त्यानंतर तिने आईला जाब विचारला. तिच्या आईने आपण कुकीला सोडलं नसल्याचं म्हटलं. पण तिला गेटबाहेर घेऊन गेल्याचं तिने मान्य केलं. स्नेहाने त्यानंतर कुकीचा पुष्कळ शोध घेतला. शोधून देणाऱ्याला बक्षीसही जाहीर केलं. मात्र, तिचा पत्ता लागला नाही.

आपल्या आईमुळे पाळीव कुत्री हरवली, म्हणून स्नेहाने प्राणिमित्र संघटनेशी संपर्क साधत पंतनगर पोलीस ठाण्यात आईविरुद्ध पोलिसात धाव घेतली आहे. या प्रकरणी स्नेहा हिची आई अश्विनी निकम यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या