बार्शीत सासूचा खून करणाऱया सुनेला अटक; खून दडपण्यासाठी घरात पडून सासूचा मृत्यू झाल्याचा बनाव उघड 

चोरीचा संशय घेतल्याने सुनेने सासूचा गळा आवळून खून केल्याची घटना बार्शीतील बगले चाळ परिसरात घडली आहे. खुनानंतर सासू पडून मृत झाल्याचा बनाव या सुनेने केला होता. मात्र, शवविच्छेदनात हा खून असल्याचे सिद्ध झाल्याने पोलिसांनी सुनेला अटक केली.

निर्मला महादेव धनवे (वय 55) असे मृत सासूचे नाव असून, कोमल अनिल धनवे (रा. बगले चाळ, बार्शी) हिला अटक करण्यात आली आहे.

सासू निर्मला यांनी कोमलवर पैसे व मणीगंठण चोरल्याचा आळ घेतला होता. या वादातून घटनेच्या दिवशी पहाटेच्या सुमारास कोमलने सासूला बेदम मारहाण करून गळा आवळला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. खुनाचा प्रकार दडपण्यासाठी कुभांड रचत सासू पडून जखमी होऊन मृत्यू झाल्याचा बनाव कोमलने केला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. वैद्यकीय अहवालानुसार निर्मला यांचा मृत्यू हा डोक्यात गंभीर जखम व गळा आवळल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सासूच्या खूनप्रकरणी कोमल धनवे हिला अटक केली आहे. बार्शीचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल तपास करीत आहेत.

निर्मला आणि कोमल यांच्यात घरगुती कारणाकरून नेहमी वाद होत होते. याच कारणाने सहा महिन्यापपूर्वी पती अनिलने कोमलला माहेरी सोडले. तिने माफी मागितल्यानंतर दोन महिन्यांपूर्की तिला घेऊन आल्याचे अनिलने पोलिसांना सांगितले.