भयंकर… अंगात आल्याचे सांगत आईनेच घेतला मुलीचा बळी

सामना प्रतिनिधी । वसई

११ वर्षांच्या मुलीच्या पोटात दुखते म्हणून तिच्या आईने माझ्या अंगात वारे आले आहे, आज कायमचे बरे करते असे सांगत पोटच्या मुलीचाच बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार विरारच्या मनवेलपाडा येथे उघडकीस आला. अंगात वारे घुमवत या महिलेने मुलीच्या अंगावर बसून तिची मान दाबून घशात हात घातला. त्यामुळे मुलीचा अक्षरशः तडफडत बळी गेला. या भयंकर प्रकरणात मुलीचे वडील आणि मावशीही सामील झाले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे विरार परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

विरार पूर्वेतील मनवेलपाडा येथे आई जीवदानी इमारतीत भेकरे कुटुंब राहते. गेल्या अनेक दिवसांपासून अंबाजी भेकरे यांची मुलगी सानिया (११) हिच्या पोटात दुखत होते. सरकारी तसेच खासगी रुग्णालयात उपचार करूनही तिची पोटदुखी थांबत नव्हती. त्यामुळे सानियाची आई मीनाक्षी हिने आपल्या अंगात देवी येत असून तिच्यावर आपण घरीच उपचार करू असे पतीला सांगितले. इतकेच नाही तर शनिवारी रात्री तिने झोपलेल्या सानियाच्या अंगावर बसून अबीर, गुलाल टाकून तिचे जोरजोरात पोट दाबले. संतापजनक म्हणजे तिच्या तोंडात हात घालतानाच मानही दाबली. यामुळे सानियाला भयंकर त्रास होऊ लागला व ती जोरजोरात रडू लागली. त्यामुळे मीनाक्षीने आपली बहीण माधुरी शिंदे व पतीला हातपाय धरायला सांगितले आणि स्वतः सानियाचे तोंड दाबले. यात श्वास कोंडल्याने या दुर्दैवी मुलीचा अक्षरशः तडफडून मृत्यू झाला.

मृत मुलीची रात्रभर पूजाअर्चा केली
या भयंकर कृत्याने सानियाचा मृत्यू झाल्यानंतर मीनाक्षीने रात्रभर पूजाअर्चा केली, पण सकाळपर्यंत सानियाने कोणताच प्रतिसाद न दिल्याने भानावर आलेल्या भेकरे कुटुंबाने सानियाला खासगी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टांनी तिला मृत घोषित केले.

पोलिसांना धक्का बसला
डॉक्टरांनी माहिती दिल्यानंतर सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करणाऱया पोलिसांना सानियाचा पोस्टमॉर्टेम अहवाल वाचून धक्काच बसला. त्यांनी याबाबत खोदून तपास केल्यानंतर या अघोरी प्रकरणाचा भंडाफोड झाला.