मुलगा होत नाही म्हणून हिणवले, महिलेने चार मुलींची गळा चिरून हत्या केली

घरच्यांचे टोमणे असह्य झाल्याने एका आईने आपल्या चार मुलींचा गळा चिरून हत्या केली. मुली गाढ झोपेत असताना तिने त्यांची हत्या केली. धारदार शस्त्राने गळा चिरून या महिलेने चौघींची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यानंतर चाकूने या महिलेने स्वतःवर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला.पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा चार लहान मुली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पाहून त्यांनाही धक्का बसला होता. ही घटना हरयाणामधील मेवात जिल्ह्यातील पिपरोली गावातील आहे.

फरमिना हिला चार मुली होत्या. एकही मुलगा नसल्याने तिला घरचे टोमणे मारायचे आणि घालून-पाडून बोलत होते. हे सगळं असह्य झाल्याने फरमिना नैराश्यात गेली होती. फरमिनाला मुस्कान (7वर्ष) , मिस्कीना(4 वर्ष), अल्फीशा (3 वर्ष) आणि अर्बिना(3 महिने) नावाच्या मुली होत्या.

शुक्रवारी म्हणजेच 27 नोव्हेंबरला सकाळी या मुलींचा बाप खुर्शिद याला त्याच्या चारही मुली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसून आल्या. हे दृश्य पाहून खुर्शिदला काय करावं हे कळेनासं झालं होतं. त्याने आरडाओरडा करायला सुरुवात केल्यानंतर शेजारपाजारचे त्याच्या घराकडे धावले. खुर्शिदने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. आपल्या चार मुलींची हत्या झाली असून पत्नीही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. महिला घरात बेशुद्धावस्थेत आढळली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून नल्हार येथील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिचा जबाब घेण्यासाठी पोलिसांचे पथक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तिच्या मानसिक स्थितीची तपासणी झाल्यावर तिचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. तिच्यावर हत्या आणि आमहत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिस उप अधीक्षक विवेक चौधरी यांनी सांगितले की, फरमिनाचा पती शुक्रवारी पहाटे घरी परतला. तेव्हा दार उघडण्यात आले नाही. त्याने खिडकी उघडून आत बघितले, तेव्हा मुली आणि पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्याला दिसले. त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. शेजार्‍यांनी मदतीने दरवाजा तोडून तो आत आला.तेव्हा  पलंगावर मुलींचे मृतदेह असून त्यांचे गळे चिरले होते. तर महिला बेडरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. दरवाजा आतून बंद असल्याचे ही हत्येची घटना नाही. महिलेने चार मुलींची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासावरून स्पष्ट होत असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

आपल्याला मुलगा होत नसल्यामुळे पत्नी नैराश्यात असल्याचे महिलेच्या पतीने पोलिसांना सांगितले. या दोघांचे 2012 मध्ये लग्न झाले होते. मुलगा नसल्याने या जोडप्यामध्ये अनेकदा भांडणे होत होती, असे शेजाऱ्यांनी सांगितले. मुलगा होत नसल्याने पती पत्नीला दोष देत होता , असेही शेजाऱ्यांनी सांगितले. मात्र, महिलेच्या पतीने हे आरोप फेटाळले असून आपण मुलासाठी पत्नीवर दबाव टाकला नव्हात, आपल्या मुलींवर जीवापाड प्रेम असल्याचे त्याने सांगितले.

शवविच्छेदनानंतर मुलींचे मृतदेह वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. गळे चिरल्याने अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या