… म्हणून आईनेच एक महिन्याच्या चिमुरडीचा गळा घोटला, नागपुरातील घटना

1136

दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या एक महिन्याच्या चिमुकलीच्या उपचारावर दररोज होणारा हजारोंचा खर्च करण्याची ऐपत नसल्यामुळे जन्मदाती आई व आजीने टोकाचे पाऊल उचलीत तिचा गळा आवळून खून केला. ही मन हेलावून सोडणारी घटना कामठी तालुक्यातील रनाळा येथे बुधवारी मध्यरात्री 2 वाजता घडली. गुरुवारी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी दोघींनाही ताब्यात घेतले आहे. पायल अनिल कनोजे (आई) व पुस्तकला उत्तम कनोजे (आजी) अशी आरोपींची नावे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मौदा तालुक्यातील अरोली निवासी अनिल उत्तम कनोजे यांना महिनाभरापूर्वी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मुलगी झाली. ते मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मुलीच्या जन्मामुळे त्यांच्या कुटुंबात आनंद होता. मात्र कालांतराने तिची प्रकृती खालावल्याने तिला कामठी येथील एका खासगी रुग्णलयात दाखल केले. औषधोपचारानंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. दरम्यान डॉक्टरांनी तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून उपचारासाठी दररोज हजारो रुपये खर्च होणार असल्याचे सांगितले. घरची परिस्थिती, जवळ होता नव्हता तेवढा पैसा उपचारावर खर्च केला. आता पुढील उपचारासाठी पैसा कुठून आणायचा, या विवंचनेत संपूर्ण कुटुंब होते. अशाही परिस्थिती खर्च झेपत नसतानाही उपचार सुरुच ठेवला. काही दिवसात तिला आरामही पडला. कनोजे कुटुंब उपचारासाठी आठवड्यातून 3 दिवस अरोलीवरुन कामठीला चिमुकलीसह येत होते.

गोठ्यात फेकला मृतदेह
बुधवारी दुपारी चिमुकलीची आई पायल, वडील अनिल, काका सुनील व आजी पुस्तकला हे सर्व कामठीला आले होते. तपासणीनंतर ते रनाळा येथील नातेवाईक करण मुरारी बर्वेकर यांच्याकडे मुक्कामी होते. रात्री दोन वाजताच्या सुमारास सर्व झोपेत असताना आई पायल उठली असता तिला चिमुकली दिसली नाही. तिने शोधाशोध केली. त्यानंतर घटनेची माहिती नवीन कामठी पोलिसांना दिली. रात्रीच्या अंधारात पोलिसांनी शोध घेतला. संशयाच्या आधारे आई व आजीची कडक शब्दात चौकशी केली असता पायलने आजी पुस्तकला चिमुकलीला घेऊन ज्या मार्गाने गेली, त्या दिशेने पोलिसांना सोबत नेले. रनाळा निवासी रंजित लोणारे यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत पांडुरंग गणेर यांच्या गोठ्यातील एका खड्ड्यात चिमुकलीचा मृतदेह फेकल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेतला. घटनेचे रहस्य उलगडण्यासाठी तसेच घटनेतील मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी मृत चिमुकलीची आई व आजीला ताब्यात घेऊन विचारपूस सुरू केली आहे. परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येत आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार चिमुकलीचा गळा आवळून खून करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या