मुलाचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आईने त्याला भेटायला येणे गरजेचे, हायकोर्टाचा दिलासा

588
mumbai bombay-highcourt

मुलाचा ताबा कायम आपल्याकडे राहावा यासाठी हायकोर्टात धाव घेतलेल्या वडिलांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. 11 वर्षांच्या मुलाचे मत विचारात घेऊन हायकोर्टाने मुलाचा ताबा वडिलांकडे सोपवला. एवढेच नव्हे तर मुलाच्या संगोपनात आईचा सहवास महत्त्वपूर्ण असला तरी त्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महिन्यातून एकदा त्याला आईकडे जाण्याची आवश्यकता नाही तर आईने त्याला भेटायला आले पाहिजे असे मत न्यायमूर्तींनी नोंदवले.

सांगली येथे राहणारे अमित (नाव बदललेले) यांचा विवाह कोल्हापुरातील प्रियांका (नाव बदललेले) यांच्याशी झाला. अमित हे आपली पत्नी व मुलासह पुणे येथे राहतात. काही कारणास्तव अमित आणि प्रियांका यांच्यात भांडण झाले. त्यामुळे प्रियांका आपल्या मुलाला घेऊन माहेरी आली. आपल्या मुलाचा ताबा परत मिळावा यासाठी अमित याने ऍड. भरत मोरे यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला. हा अर्ज कौटुंबिक न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. या याचिकेवर न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायमूर्तींनी मुलाला आई की, वडिलांजवळ नेमके कुठे राहायचे आहे याबाबत त्याचे मत जाणून घेतले व त्याचे म्हणणे विचारात घेत ताबा वडिलांकडे सोपवला. तसेच तिसऱ्या शनिवारी मुलाला आईकडे कोल्हापुरात सोडावे असे आदेशही दिले.

खेळावर परिणाम
महिन्यातील तिसऱ्या शनिवारी आईकडे गेल्यानंतर मुलाचे शैक्षणिक नुकसान होईल. शिवाय त्याच्या खेळावरही परिणाम होईल असा युक्तिवाद वडिलांच्या वतीने हायकोर्टात करण्यात आला. त्यावर न्यायमूर्तींनी वडिलांना दिलासा देत मुलाने आईकडे जाण्याची आवश्यकता नाही तर आईने त्याला भेटायला आले पाहिजे असे निरीक्षण नोंदवले व याचिका निकाली काढली.

आपली प्रतिक्रिया द्या