शेजाऱ्यांशी झालेल्या वादातून जन्मदात्या आईने मुलांना तिसऱ्या मजल्यावरून फेकले

शेजारी राहणाऱ्या महिलांसोबत क्षुल्लक कारणावरून वाद झाल्याने संभाजीनगर येथे एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांना तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून देत त्यांच्यापाठोपाठ स्वत:ही उडी घेतली. यात एक वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला तर मुलगी व महिला गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बजाजनगरातील छत्रपतीनगर परिसरात घडली.

एका खासगी कंपनीत काम करणारे सतीश आतकर हे पत्नी अनिता, एक वर्षाचा मुलगा सोहम आणि दोन वर्षांची मुलगी प्रतीक्षासह एका भाड्याच्या खोलीत राहतात. मूळ बीड जिल्ह्यातील हे कुटुंब कामानिमित्त बजाजनगरातील छत्रपतीनगरात असलेल्या जिजामाता हौसिंग सोसायटीत राहण्यासाठी आले होते. नेहमीप्रमाणे सतीश हा कामानिमित्त सकाळी बाहेर पडला होता.

दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अनिताने अचनाक एक वर्षाच्या सोहमला गच्चीवरून खाली फेकले, त्यानंतर मुलगी प्रतीक्षा हिला ढकलून दिल्यानंतर स्वत:देखील खाली उडी मारली. यामध्ये मुलगा डोक्यावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी प्रतीक्षा आणि आई अनिता या दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या