मुलांच्या शिक्षणावरील खर्चाच्या नैराश्येतून आईची मुलीसह आत्महत्या

धनगर समाजातील एका महिलेने मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा शैक्षणिक खर्च परवडत नसल्याने आपल्या लहान पाच वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना निलंगा तालुक्यातील कल्याणी माळेगाव येथे मंगळवारी सायंकाळी घडली असून, बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.

भाग्यश्री व्यंकट हलसे (26, रा. माळेगाव कल्याणी, ता. निलंगा) ही महिला रोजंदारी करून उपजीविका भागवित होती, तर पती शेळ्या राखतात. तिचा मोठा मुलगा गावापासून 10 कि. मी. अंतरावरील ताडमुगळी येथील इंग्रजी शाळेत चौथीच्या वर्गात आहे. पुढील शिक्षण औराद येथे घ्यायचे होते. मुलास इंग्रजी माध्यमाच्या शाळेत चांगले शिक्षण मिळावे, अशी तिची अपेक्षा होती. पण चांगले शिक्षण मिळण्यासाठी आर्थिक अडचणी होत्या. आपले कुटुंब आर्थिक अडचणीत असल्यामुळे मंगळवारी मुलगी समीक्षा व्यंकट हलसे (5) हिच्यासह भाग्यश्रीने एका विहिरीत आत्महत्या केली.

ही माहिती मिळताच औराद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे यांनी आपले कर्मचारी तात्काळ गावात पाठवून सदरील महिलेच्या नातेवाईकांना कळवून त्यांच्या समक्ष औराद ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. नंतर कल्याणी माळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण मारुती बोडके (60, रा.धनगरवाडी, ता. देवणी, जि. लातूर) या महिलेच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून औराद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.