नेवासा फाट्यावर रस्ते अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

नेवासा ते नेवासा फाटा रस्त्यावरील मध्यमेश्वरनगरसमोरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर भरधाव वेगात येणाऱ्या माल ट्रकने दुचाकीस्वारास जोराची धडक दिली. या अपघातात तो जागीच ठार झाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आब्बास अब्दुलहमीद शेख (50, रा. आलमगिर ता. जि. नगर) हे मोटारसायकल (क्रमांक एम.एच. 16 बी.डी. 1866) वरून नेवाशाकडे येत असताना समोरून येणाऱ्या माल ट्रक (क्रमांक एम.एच. 17 बी.डी. 8700) भरधाव वेगात जोराची धडक दिल्याने मोटारसायकलस्वाराच्या डोक्याला आणि कानाला गंभीर मार लागला. यामुळे त्याच्या नाकातून रक्त येऊन तो जखमी झाला. त्यामुळे त्याला रुग्णवाहिकेतून औषधोपचारासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याचे उपचारापूर्वीच निधन झाल्याचे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.

याबाबत बरकत बरकतउल्ला शरीफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात माल ट्रक चालक सुधाकर वसंत चव्हाण (35, रा.वार्ड नं. 7 सरस्वती कॉलनी ता. श्रीरामपूर) यांच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हवालदार तुळसीराम गिते करत आहेत.