हे प्रभू! एका हातात छत्री घेऊन मोटरमन चालवतोय ट्रेन

50

सामना ऑनलाईन। झारखंड

काही महिन्यांपूर्वी सीआरपीएफच्या एका जवानाने लष्करात निकृष्ट अन्न मिळत असल्याचा व्हिडिओ सोशल साईटवर टाकून आपल्या व्यथा जगासमोर मांडल्या होत्या. याच जवानाच्या पावलावर पाऊल टाकत एका मोटरमनने रेल्वेची दुरवस्था सांगणारा एक व्हिडिओ सोशल साईटवर टाकला आहे. झारखंडमधील एका पॅसेंजर ट्रेनमधला हा व्हिडिओ असून यात चक्क एका हातात छत्री घेऊन मोटरमन ट्रेन चालवत असल्याचं दिसत आहे. ट्रेनच्या छतातून गळणार पाणी थेट छत्रीवर पडत असल्याचंही दिसतयं. हजारो प्रवाशांचे प्राण ज्याच्या हातात आहेत त्या मोटरमनची ही दुरवस्था बघून नेटकऱ्यांनी तर रेल्वेलाच धारेवर धरले असून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी याची दखल घ्यावी अशी विनंती या मोटरमन व त्याच्या गार्डने केली आहे. बी.के.मंडल असे या मोटरमनचे नाव आहे.

धनबाद रेल्वे मंडळाच्या पॅसेंजर ट्रेनमधला हा व्हिडिओ आहे. नेहमीप्रमाणे याही पावसाळ्यात मोटरमन हातात छत्री घेऊन ट्रेन चालवत असताना गार्डने हा व्हिडिओ काढला आहे. त्याचबरोबर पॅसेंजर ट्रेनची दुरवस्था ,त्याचा मोटरमनला होणारा त्रास व त्याकडे रेल्वे प्रशासनाने केलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष याकडेही गार्डने लक्ष वेधले आहे.

डोक्यावर कोसळणारा पाऊस झेलत एका हाताने ट्रेन चालवणं मोटरमन व प्रवासी यांच्यासाठी किती धोकादायक ठरू शकतं हे रेल्वेला दाखवण्यासाठीच हा व्हिडिओ काढण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या