
हिंदुस्थानी पर्यटक हे जगभरात संतुलित पर्यटनशैलीसाठी ओळखले जातात. ते निर्धारित वेळेत सर्वसमावेशक पर्यटनाचा आनंद घेतात, अशी कौतुकाची थाप माउंट फेबर लेझर या कंपनीच्या संचालकांनी दिली आहे. हिंदुस्थानी पर्यटकांना सोयीसुविधा देण्याच्या दृष्टीने आणखी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
माउंट फेबर लेझर (Mount Faber Leisure) ही कंपनी मनोरंजन आणि जीवनशैली सेवांच्या संचातील सिंगापूरच्या आघाडीच्या ऑपरेटरपैकी एक आहे. सिंगापूर येथील प्रसिद्ध केबल कार सर्व्हिसचं संचालन ही कंपनी करते. त्याखेरीज अन्य पर्यटन सुविधाही ही कंपनी पुरवते. कंपनीच्या उत्पादनांच्या आणि सेवांच्या पोर्टफोलिओमध्ये सिंगापूर केबल कार, सेंट्रल बीच बाजार, विंग्स ऑफ टाइम, स्कायहेलिक्स सेंटोसा, सेंटोसा आयलंड बस टूर, माउंट फॅबर हेरिटेज टूर, माउंट फॅबर पीक, आर्बोरा हिलटॉप गार्डन आणि बिस्ट्रो, आर्बोरा कॅफे, डस्क रेस्टॉरंट आणि बार, गुड ओल्ड डेज फूड कोर्ट आणि वेस्टर्न ग्रिल, फन शॉप, केबल कार गिफ्ट शॉप आणि फॅबर लायसन्स सदस्यत्व अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होतो. सिंगापूर येथे पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांसाठी ते नवनवीन आकर्षण घेऊन आले आहेत.
यात हिंदुस्थानी पर्यटकांसाठी खास कार्यक्रम ठेवण्यात आल्याची माहिती कंपनीच्या संचालक मंडळाने दिली. हिंदुस्थानी पर्यटक हे संतुलित पर्यटन शैलीचे असतात. अनेक देशांचे पर्यटक हे सिंगापूरमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी येतात. त्यात सिंगापूरमध्ये भटकंती, मौजमजा, शॉपिंग यापैकी एक हेतू त्यांनी निश्चित केलेला असतो. पण, हिंदुस्थानी नागरिक मात्र त्यांच्या नियोजित वेळेत हे सगळं काही करतात आणि त्यांना नाविन्याची आवड असते, असं निरीक्षणही संचालक मंडळाने यावेळी नोंदवलं.