शाब्बास तानाजी! किल्ले अलंग- मदन- कुलंग विक्रमी वेळेत सर

तानाजी केकरे या गिर्यारोहकाने सह्याद्री खोऱ्यात चढाईला अत्यंत कठीण श्रेणीमध्ये गणले जाणारे दुर्ग त्रिकुट अलंग-मदन- कुलंग अवघ्या 3 तास 12 मिनिटांमध्ये चढाई करून नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

तानाजी केकरे हा महाराष्ट्र रेंजर्स या संस्थेचा गिर्यारोहक. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 366 व्या जयंतीचे औचित्य साधून 14 मे रोजी त्याने ही कामगिरी केली.

नाशिक जिह्यातील इगतपुरी विभागातील कळसूबाई शिखराच्या रांगेत सर्वात कठीण अलंग, मदन आणि कुलंग असे तीन किल्ले लक्ष वेधून घेतात. हे किल्ले सर करण्यासाठी प्रस्तरारोहण तंत्राची व साहित्याची माहिती असणे आवश्यक आहे.

घनदाट जंगल आणि विरळ वस्ती यामुळे या परिसरातील भटपंती तशी कस पाहणारी आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा, भरपूर पाऊस यामुळे हे दुर्गत्रिकुट तसे उपेक्षितच आहे. अशा अवघड किल्ले त्रिकुटाच्या चढाईची आखणी महाराष्ट्र रेंजर्स या गिर्यारोहण क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या संस्थेने केली.

या मोहिमेत महाराष्ट्र रेंजर्स संस्थेचे प्रदीप गायकवाड, जयेश हरड, निखिल धावडे, सुनील येवले, मिलन गायकवाड, हरिदास भांगरे इत्यादी गिर्यारोहक सहभागी झाले होते. या कामगिरीबद्दल तानाजीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

रोजचा सराव- प्रचंड मेहनत
तानाजी केकरे व टीमने 13 मे रोजी अलंगलगत असलेल्या आंबेवाडी या गावी मुक्काम करून दुसऱया दिवशी सकाळी अलंग किल्ल्याची वाट धरली. निसरडी वाट, घनदाट असलेले जंगल यामुळे अतिशय दुर्गम भागात मोडणारे अलंग (सुमारे 4500 फूट), मदन ( सुमारे 4900 फूट) आणि कुलंग (सुमारे 4525 फूट) उंचीचे (समुद्रसपाटीपासून) हे त्रिकुट तानाजीने सरावाच्या जोरावर लीलया सर केले. सर्वसाधारणपणे त्यांच्या चढाईसाठी गिर्यारोहकांना क्षमतेनुसार एक ते दोन दिवस लागतात.

तानाजी केकरे आंबेवाडी गावाचा रहिवासी असून ट्रेक गाईडचे काम करतो. त्याने बेसिक तसेच अॅडव्हान्स रॉक क्लाइंबिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. याआधी लिंगाणा हा अवघड श्रेणीतील सुळका कमी वेळेत सर करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. तानाजी यांनी याआधी वजीर, वानरलिंगी, कळकराई, तैलबैला यासारख्या अत्यंत कठीण अशा सुळक्यांवर यशस्वीरीत्या चढाई केली आहे.