सुपात उंदीर सापडला, हॉटेलला 19 कोटींचे नुकसान

36

सामना ऑनलाईन, बीजिंग

गर्भवती महिलेला दिलेल्या सुपामध्ये मेलेला अख्खा उंदीर सापडल्याने चीनमधल्या हॉटेलची जबरदस्त बदनामी झाली आहे. बदनामीसोबतच या हॉटेलला 19 कोटींचे आर्थिक नुकसानही सहन करावे लागले आहे. ज्या भागामध्ये हा प्रकार झाला तिथलं आऊटलेट काही दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय हॉटेल प्रशासनाने घेतला आहे.

शिआबू शिआबू असं या हॉटेल चेनचं नाव असून ती चीनमध्ये जबरदस्त प्रसिद्ध आहे. शेनडूंग भागातील त्यांच्या हॉटेलमध्ये महिलेला सुपात उंदीर सापडला होता. हा प्रकार बघून घाबरलेल्या हॉटेल प्रशासनाने महिलेला नुकसानभरपाई देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र या महिलेने हा प्रस्ताव धुडकावून लावला होता.

प्रसिद्ध हॉटेलमध्ये सुपात उंदीर सापडल्याची बातमी या महिलेने सोशल मिडीआवर व्हायरल केल्यानंतर या हॉटेलची बदनामी व्हायला सुरुवात झाली. याचा परिणाम तिथल्या शेअर बाजारावरही झाला. या हॉटेलचे शेअर्स गडगडले आणि आजपर्यंत कधीच गेले नव्हते इतक्या खालच्या पातळीवर पोहोचले. शेअर बाजारातील या घसरणीमुळे या हॉटेल कंपनीला 19 कोटींचं नुकसान सहन करावं लागलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या