जायकवाडीचे पाणी तातडीने खडका बंधा-यात सोडण्यासाठी हालचाल – पंकजा मुंडे

2409

जायकवाडी धरणातील पाणी तातडीने खडका बंधाऱ्यात सोडण्यासाठी शासन स्तरावर आपण हालचाली सुरू केल्या आहेत तथापि, भविष्यात पाण्याचा प्रश्न भेडसावू नये यासाठी जायकवाडीचे पाणी ‘लिफ्ट’ पध्दतीने वाण धरणांत सोडण्यासाठी देखील आपण प्रयत्न करत असल्याचे पंकजा मुंडे यांनी परळी येथील एका कार्यक्रमात सांगितले. मराठवाड्यात होत असलेल्या वॉटरग्रीड चा फायदा या भागालाही मिळवून देऊ, असे त्या यावेळी म्हणाल्या.

पुढे बोलतांना मुंडे म्हणाल्या की, परळी परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने वाण धरण अद्यापही कोरडेच आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्या बरोबरच सिंचनाचाही प्रश्न गंभीर बनला आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सध्या खडका बंधारा उपयोगाचा आहे त्यामुळे तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जायकवाडीचे पाणी माजलगांव धरणात व तिथून खडका बंधा-यात सोडण्यात येईल. या शिवाय भविष्यात हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी  वाण व पोहनेर नदीवर बॅरेजेस बांधणे तसेच  जायकवाडीचे पाणी लिफ्ट पध्दतीने वाण धरणांत सोडण्याचा आपला प्रयत्न आहे, हा भाग वॉटरग्रीड प्रकल्पात समाविष्ट करू, यातील सर्व आवश्यक त्या कायदेशीर बाबींवर तोडगा काढणार असल्याचे त्या म्हणाल्या.