हाऊसफुल्ल – निराशा करणारं भूत

8475

>> वैष्णवी कानविंदे- पिंगे

भुताटकीच्या सिनेमांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते प्रेक्षक घाबरला पाहिजे. मान्य, पण आजवर अनेक सिनेमांमध्ये चित्रविचित्र चेहरे, घाणेरडी दृश्यं, रक्ताचे पाट दाखवून हे केलं गेलंच की… सिनेमा बदलत चालला आहे आणि त्यानुसार भुताटकीच्या नियमित प्रेक्षकाला देखील नुसत्या भयासोबत आणखी काहीतरी वेगळं पाहायला मिळावं अशी अपेक्षा असते. किंबहुना, खंबीर कथा असेल आणि त्याला उत्तम दिग्दर्शनाची जोड असेल तर तो सिनेमा नक्कीच बाजी मारू शकतो… पण दुर्दैवाने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भूत- भाग पहिला ः द हाँटेड शिप’ या सिनेमाने आधी उंचावलेल्या सगळ्या अपेक्षा फोल ठरवल्या आणि प्रेक्षकांची अंमळ निराशाच केलीय.

या सिनेमाची कथा सिनेमाच्या नायकाभोवती फिरते. नायक पृथ्वी अर्थात विक्की कौशल एक शिपिंग ऑफिसर असतो. एका घटनेत त्याच्या बायको आणि मुलीचा मृत्यू झालेला असतो आणि तेव्हापासून त्याचं आयुष्य पार बदलून गेलेलं असतं. त्याला कायम त्या दोघींचे भास होत असतात. अशातच जुहू बीचवर कोलंबोवरून एक जहाज येऊन रुतून बसतं. मग त्या जहाजाचं परीक्षण करायचं काम पृथ्वीवर येतं. ते करताना त्याला अनेक भास होतात, विविध अनुभव येतात आणि मग काय होतं यावर बेतलेला हा सिनेमा.

मुळात जुहू येथे अडकलेल्या जहाजाची सत्यघटना आणि त्यावर सुचलेली ही संकल्पना नक्कीच चांगली आहे. पण त्या संकल्पनेला फुलवतानाची कथा इतकी ढिसाळ आहे की काही केल्या ती पकडच घेत नाही. त्यात पटकथा देखील विस्कळीत असल्याने प्रेक्षक सिनेमापासून मध्यांतराच्या आधी लांब गेलेला असतो. दिग्दर्शक- लेखकाने आजवर अनेक भुताटकी असलेले सिनेमे पाहून त्यावरून प्रेरित होऊन तसंच काहीतरी करायचा प्रयत्न केला आहे, पण हा सिनेमा पाहताना सुरुवातीच्या काही दृश्यांनंतर भय कुठच्या कुठे उडून जातं आणि त्याची जागा घेतो फक्त कंटाळा.

विक्की कौशल म्हटल्यावर सिनेमा नक्की चांगला असणार असं कुठेतरी आश्वासन वाटत असतं, ते या सिनेमाने मात्र पार धुळीला मिळवलं आहे. अभिनेता म्हणूनदेखील तो विशेष प्रभाव पाडू शकला नाही, ना भूमी पेडणेकर. एकूणच चांगले कलाकार या सिनेमात असूनही त्यांचा चांगला वापर न करता आल्यामुळे एक संधी वाया गेल्याची हुरहूर लागते.

सिनेमाची बरीचशी दृश्यं भयावह वाटण्यापेक्षा किळसवाणी अधिक वाटतात. एवढंच नाही, तर जेव्हा पृथ्वीची पत्नी आणि मुलगी जाते तेव्हा प्रेक्षकाला वाईट वाटणं अपेक्षित असतं, पण तेदेखील वाटत नाही. शेवटी केलेला मंत्रोच्चार किंवा काही चित्रविचित्र दृश्यं सिनेमाला सुमार भुताळी सिनेमांच्या रांगेत नेऊन बसवतात.

अर्थात बॅकग्राऊंड स्कोर आणि सिनेमॅटोग्राफी मात्र चांगली आहे. त्यामुळे सिनेमा बघताना थोडीबहुत मजा येऊ शकते, पण सिनेमाला चांगलं म्हणण्याचं ते ओढून-ताणून कमावलेलं कारण म्हणावे लागेल. हे भुताळी जहाज प्रेक्षकांची निराशा करतं हेच खरं.

  • सिनेमा – भूत – भाग पहिला : द हाँटेड शिप
  • दर्जा – *
  • निर्माता – हिरू यश जोहर, करण जोहर, अपूर्व मेहता, शशांक खेतान n
  • दिग्दर्शक/लेखक- भानू प्रताप सिंग
  • संगीत – अखिल सचदेव
  • कलाकार – विक्की कौशल, भूमी पेडणेकर, आशुतोष राणा
आपली प्रतिक्रिया द्या