हाऊसफुल्ल – करमणुकीची आनंदवार्ता

1938

>> वैष्णवी कानविंदे -पिंगे

वर्ष संपताना काही तरी चांगली बातमी कानावर पडावी आणि शेवट गोड व्हावा असं सगळ्यांनाच वाटतं. आणि नेमकं 2019च्या शेवटी अक्षय कुमारचा ‘गुड न्यूज’ हा सिनेमा प्रदर्शित झालाय. हा सिनेमा इतर चार करमणूकप्रधान सिनेमांच्या पठडीतला असला तरी प्रेक्षकांना अपेक्षित असलेली मिठास मात्र ही ‘गुड न्यूज’ नक्कीच देऊ करते.

दोन एकमेकांपेक्षा अगदी वेगळी असलेली जोडपी. दोघांमधला समान धागा म्हणजे दोघांचे आडनाव बत्रा. बाकी त्यांच्यामध्ये कसलेही साम्य नाही. पण आयव्हीएफच्या माध्यमातून बाळासाठी प्रयत्न करत असताना चुकून स्पर्मची अदलाबदली होते आणि मग एकीच्या पोटात दुसऱया जोडप्याचं बाळ आणि दुसरीच्या पोटात पहिल्या जोडप्याचं बाळ असा गोंधळ उडतो. मग काय होतं, हा गुंता कसा सुटतो वगैरे गोष्टी म्हणजे ‘गुड न्यूज’ हा सिनेमा.

खरं तर विषय तसा गंभीर असला तरीही हलक्याफुलक्या पद्धतीने आणि विनोदाचा बाज राखून दिग्दर्शकांनी खूप छान हाताळला आहे. येथे चटपटीत संवाद आणि संकलनाच्या ठिकाणी लावलेली कात्री प्रेक्षकांसाठी करमणूक सुसह्य करतात.

अक्षय कुमार आणि करीना कपूर या जोडीने खूप छान काम केलं आहे. त्यांचा वावर आणि काही विनोदी प्रसंग हशा वसूल करतात आणि प्रकर्षाने लक्षातही राहतात. कियारा अडवाणी आणि दिलजीत दोशांज ही जोडीदेखील चांगली आहे. अर्थात करीना अक्षय मुख्य पात्रं असल्याचं ठळकपणे दिसतं. त्यामानाने दिलजीत आणि कियाराच्या वाटेल थोडा कमी वाव आहे. पण त्या दोघांनी आपली बाजी चांगली पार पाडली आहे. आदिल हुसेन यांनीदेखील विनोदातील सहजता बऱयापैकी राखली आहे.

दिग्दर्शक राज मेहता यांनी दिग्दर्शनाचा केलेला हा पहिला प्रयत्न असला तरी तो नेटका आहे. कारण गंभीर विषयाला विनोदी पद्धतीने हाताळायचं, त्यात फुटकळ विनोद टाळून भावनिक स्पर्शही द्यायचा हे सगळं सोपं नव्हतं. पण दिग्दर्शकांनी ते साधलं आहे. अर्थात आयव्हीएफची बाजू धरताना दुसरीकडे दत्तक पद्धतीबद्दल जे विश्लेषण केलं आहे ते टाळता आलं असतं तर बरं झालं असतं. बाकी सिनेमाचं लिखाण, मांडणी या सगळ्या गोष्टी बऱया जमल्या आहेत.

सिनेमाचा पहिला भाग खूपच छान आणि खुसखुशीत झाला आहे मात्र दुसऱया अर्ध्या भागात सिनेमा थोडा गडबडल्यासारखा झालाय. म्हणजे थोडक्यात सुरुवात केली असताना नंतर काय करायचं हे कळल्यावर जसं होतं तसं काहीसं झालं आहे. एकूणच सिनेमा करमणुकीच्या दृष्टीने चांगला आहे. जास्त पसरट नसल्यामुळे त्रुटी इतक्या जाणवत नाहीत. अजून चांगला होऊ शकला असता इतकंच. पण सध्या असलेल्या रंगीबेरंगी वातावरणात हा सिनेमा आनंदाची भर घालेल हे मात्र नक्की.

सिनेमा गूड न्यूज

  • दर्जा – ***
  • निर्माता – हिरू यश जोहर, अरुणा भाटिया, करण जोहर, अपूर्वा मेहता, शशांक खैतान
  • दिग्दर्शक – राज मेहता
  • लेखक – ज्योती कपूर, राज मेहता, शशांक शर्मा
  • कलाकार – अक्षय कुमार, करीना कपूर, कियारा अडवाणी आणि दिलजीत दोशांज
आपली प्रतिक्रिया द्या