नुसत्या निकामी गोळय़ांची ठो ठो!

ज्यांनी ‘गँग ऑफ वास्सेपूर’ हा सिनेमा पाहिला असेल…. किंबहुना अनुभवला असेल त्याला गँगच्या धाटणीचा सिनेमा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी हे समीकरण किती खमंग होऊ शकतं याची पुरेपूर कल्पना आली असेल. ‘गँग ऑफ वास्सेपूर’च्या दोन्ही भागांचा विचारही सुन्न करतो. अनुभवाच्या पातळीवर अत्यंत सकस असणाऱया आणि अभिनयाच्या पातळीवर अत्यंत उच्च दर्जाच्या त्या सिनेमाची तुलना तशी अशक्यच. पण ‘बाबूमोशाय बंदूकबाझ’ या सिनेमाचा ट्रेलर, त्याचा लूक, शीर्षक आणि नवाजुद्दीन सिद्दीकीला पाहिलं तेव्हा ‘गँऑवा’ची आठवण ताजी झाली. कदाचित पुन्हा एकदा उत्तम सिनेमा वाटय़ाला येईल की काय असं वाटू लागलं. प्रत्यक्षात मात्र हा सिनेमा म्हणजे नाव सोनूबाई… या म्हणीचा प्रत्यय देणारा ठरला.

ही कथा आहे, कोणाला तरी मारण्यासाठी पैसे घेणाऱया दोन भाडोत्री मारेकऱयांची. हे दोघे जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा त्या दोघांमध्ये संवाद घडतो आणि त्यातील बांके बाबूला आपला गुरू मानू लागतो. पण खरी कथा सुरू होते ती जेव्हा दोघांना एकाच सावजाला टिपण्यासाठी पैसे दिले जातात तेव्हा. मग दोघांमध्ये चढाओढ लागते. जो कोणी पहिल्यांदा सावज टिपेल तो खरा मारेकरी. तो जिंकला मग दुसऱयाने हा धंदा सोडून द्यायचा. असं ठरल्यावर मग सुरू होतो एक खेळ. यात बंदुकीच्या ठोठो पलीकडे पेम, लालसा, हवस, राजकारण या सगळय़ा गोष्टींची भेळ वाटय़ाला येते आणि तब्बल दोन तांसानी पडद्यावर जे काही चाललेलं असतं ते उरकतं एकदाचं!!

नवाजुद्दीन हा नावाजलेला अभिनेता आहे यात वादच नाही. तो कुठेही कुठच्याही भूमिकेत अगदी सहज चपखल बसतो, पण असं जरी असलं तरी या सिनेमात त्याचा डाव चुकलाय. त्याचा आवेश किंवा परत परत येणारे तेच तेच संवाद त्याच्या व्यक्तिरेखेला फिकट करून ठेवतात. अर्थात त्याच्या स्वतŠच्या मूळ अभिनय गुणामुळे तो संपूर्ण सिनेमाभर टिकून राहतो पण तरीही व्यक्तिरेखाच दुर्बळ असल्यामुळे हा नेम चुकलाय हेच खरं. जतिन गोस्वामी या कलाकाराचं पण तसंच झालंय. त्याचं या सिनेमातलं अस्तित्व जाणवतं नक्की. तो चांगला कलाकार असल्याच्या पुसटशा खुणाही दिसतात पण तरीही या सिनेमात तो भावत नाही. अभिनेत्री बिबीता बाग मात्र लक्षात राहते. तिने स्वतŠला छान साकारलंय, पण तिच्या वाटय़ाला खूप काही आलेलं नाही हेच दुर्देवं.

सिनेमाची कथा सुरुवातीला जरी बरा स्टार्ट घेत असली तरी ती नंतर विस्कळीत होत जाते आणि त्यानंतर ती परत सांधतच नाही. या सिनेमाच्या पटकथेवर खूप मेहनत घ्यायला हवी होती. अशाप्रकारच्या सिनेमांना अतिशय घट्ट बांधलेल्या पटकथेची आणि त्यावर चढवलेल्या चटकदार संवादांची नितांत गरज असते. त्याच शिदोरीवर हे सिनेमे प्रेक्षकाला धरून ठेवू शकतात. पण याच पातळीवर सिनेमा सगळय़ात जास्त घसरलाय. ढिसाळ पटकथा आणि संवादातला तोच तोच फिल्मीपणा सिनेमाला कमकुवत करतो. या कमकुवत संहितेला खेचत खेचत केलेलं दिग्दर्शन सिनेमाला कंटाळवाणं करतं. अर्थात दिग्दर्शकाने काही जागा काढल्या आहेत. पण तरीही काही जागांवर सिनेमा नाही ना तग धरू शकत! काही दृष्यं आहेत, उदा. ज्यात बांके आणि बाबू वाद घालतात किंवा बांके स्टाईल मारतो तेव्हा हसू येतं खरं, पण या काहीच दृष्यांचा प्रभाव सिनेमाभर जराही टिकत नाही.

दुसरी बाब सिनेमाच्या संगीताची. या सिनेमाला जवळजवळ चार संगीतकारांनी संगीत दिलंय. त्यामुळे ते संगीत चटकदार होण्याऐवजी सपेशल फसलंय. त्यामुळे सिनेमा बघाताना त्याच्याशी एकरूप होण्यासाठी सिनेमाच्या जातकुळीची जी धून आवश्यक असते ती या सिनेमात हरवलीय.

या सिनेमाच्या राकट जातकुळीप्रमाणे जसं बंदुकीचं विश्व दाखवलंय तसंच दुसऱया बाजूला सेक्स तितक्याच तोलाने दाखवलंय. सेक्सची दृष्यं जरी बिनधास्तपणे चित्रित करण्यात आली असली तरी जसं ‘गँग ऑफ वासेपूर’मध्ये या सगळय़ाचा एक एकत्र परिणाम साधला होता तो परिणाम या सिनेमात जराही साधला जात नाही.

एकूणच हा सिनेमा प्रेक्षकांवर आपला छाप सोडण्यास दुर्बळ ठरतो. मुळात हा सिनेमा जराही ठसत नाही त्यामुळे चांगली गोष्ट अशी की नवाझच्या आधीच्या सिनेमांचा प्रभाव तसाच राहतो आणि ‘बंदूकबाझ’ त्या प्रभावाला जराही धक्का न लावता वरच्या वर कधी निघून जातो कळतंही नाही.

  •    दर्जा – दीड स्टार
  •    सिनेमा – बाबूमोशाय बंदूकबाझ
  •    निर्माता –  किरण श्याम श्रॉफ, अश्मिथ कुंदर,   कुशन नंदी
  •    दिग्दर्शक- कुशन नंदी
  •    लेखक- घालिब असद भोपाली
  •    संगीत -गौरव दगणकर, अभिषेक लाक्रा, जोएल दुब्बा, देबज्योती मिश्रा
  •    छायांकन- विशाल वित्तल
  •    कलाकार- नवाजुद्दीन सिद्दीकी, बिदीता बाग, जतिन गोस्वामी, श्रद्धा दास, दिव्या दत्ता.