
>> रश्मी पाटकर – फडके
पैठणी… महाराष्ट्राची ओळख असलेलं महावस्त्र…जरतारी काठाची, पदरावर मोर, कोयऱ्या, कमळाची नक्षी असलेली, मऊ मुलायम पोताची आणि तितकीच नखरेल, रुबाबदार साडी. या साडीवर तमाम मराठी महिला जीव ओवाळून टाकतात. कारण, ही साडी दिसायला, नेसायला जितकी सुंदर तितकीच याची किंमत जास्त. कमीत कमी सात आठ हजारांपासून ते पाच लाखांपर्यंत ही किंमत जाऊ शकते. त्यामुळेच ठेवणीतल्या साड्यांमध्ये या साडीला भलताच मान असतो. अशा पैठणीभोवती फिरणारी कथा गोष्ट एका पैठणीची या चित्रपटात पाहायला मिळते. 68 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा’चा मान मिळवणाऱ्या या चित्रपटाची टॅगलाईन सामान्यांच्या स्वप्नांचा असामान्य प्रवास अशी आहे. पण, इतकी चांगली संहिता मिळूनही पुढील अनेक गोष्टी फसल्यामुळे विणायला गेले पैठणी पण झाली गोधडी अशी अवस्था झाली आहे.
ही एक सर्वसाधारण कुटुंबाची गोष्ट आहे. इंद्रायणी आणि सुजीत हे जोडपं सामान्य आर्थिक परिस्थितीत जीवन जगत असतं. सुजीत (सुव्रत जोशी) हा फूल विक्रेता असतो आणि इंद्रायणी (सायली संजीव) शिवणकाम करून संसाराला हातभार लावत असते. इंद्रायणीकडे येणारी स्मिता (मृणाल कुलकर्णी) ही महिला एक दिवस तिच्याकडे पैठणी घेऊन येते. पैठणीला फॉल लावून ब्लाऊज शिवायचं काम इंद्रायणी करणार असते. इतकी महागाची पैठणी पाहून हुरळून गेलेला सुजीत इंद्रायणीकडे पैठणी नेसून पाहायचा आग्रह करतो. पण, एका चुकीमुळे पांढऱ्या पैठणीवर तेलाचे डाग पडतात. सुजीत आणि इंद्रायणी हरतऱ्हेने तो डाग घालवायचा प्रयत्न करतात. पण, तो डाग तसाच राहतो. अखेर, तशीच दुसरी पैठणी आणून द्यायचा निश्चय इंद्रायणी करते. सुमारे सव्वा लाख रुपये किमतीची ती पैठणी मिळते का, त्यासाठी इंद्रायणी काय प्रयत्न करते, ते प्रयत्न यशस्वी होतात का, पैठणी मिळते का या प्रश्नांची उत्तरं चित्रपटातच पाहायला हवीत.
चित्रपटाची संहिता अतिशय रंजक आहे. पैठणीसारख्या महावस्त्रावर कथा सुंदर तऱ्हेने ‘विणता’ आली असती. पण, पटकथा अतिशय ‘विसविशीत’ झाल्याने चित्रपटाचा ‘पोत’ बिघडला आहे. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन या चारही मुख्य बाजू कमकुवत असल्याने पैठणी होऊ शकणाऱ्या चित्रपटाची गोधडी झाली आहे. अभिनयाच्या बाबत बोलायचं झालं तर सायली संजीवने आपल्या उत्तम अभिनयाची चुणूक दाखवली आहे. तिला सुव्रत जोशीनेही उत्तम साथ दिली आहे. त्यांच्यासोबत प्राजक्ता हनमघर, मृणाल कुलकर्णी, सविता मालपेकर यांनीही आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. या चित्रपटात अनेक पाहुणे कलाकार आहेत. पण, त्यांचा योग्य वापर न केल्यामुळे चित्रपटाचं गांभीर्य निघून जातं. गाणी देखील विशेष श्रवणीय नाहीत. इतर तांत्रिक बाजू ठीकठाक आहेत. एकंदर पैठणीवर चांगला गाभा असलेला पण मांडणीत फसलेला चित्रपट म्हणून गोष्ट एका पैठणीचीकडे पाहता येईल.