Movie Review : बापाच्या प्रेमाने ओथंबलेली अबोल गोष्ट – बाबा

1747

>> रश्मी पाटकर

बाप, वडील, बाबा, पिता.. जन्म देण्यापासून ते जन्म घडवण्याच्या प्रक्रियेतली एक अविभाज्य आणि अत्यावश्यक व्यक्ती. ज्याच्यावर आपण आईइतकेच अवलंबून असतो. त्याच्या कुशीत सुरक्षित राहतो, त्याच्या खांद्यावरून जग पाहतो आणि ज्याच्या अनुभवावंरूनच आपण जगरहाटीच्या व्यवहारांचे धडे घेतो, तो बाबा. आर्थिक, सामाजिक, जैविक या सगळ्या जाणिवांपलिकडचं हे नातं असतं. त्यातला संवाद हा शब्दांच्या मर्यादांमध्ये कधीच जखडलेला नसतो, याची जाणीव बाबा हा चित्रपट करून देतो.

ही कथा आहे माधव आणि शंकर यांच्या नात्याची. 1990सालचा काळ या कथेत दाखवण्यात आला आहे. माधव गावडे याला शंकर नावाचा आठ वर्षांचा मुलगा आहे. माधव, त्याची पत्नी दोघेही मूकबधीर आहेत. कोकणातल्या डोंगरावर एका छोट्याशा घरात राहणारा आणि चाकू-सुऱ्यांना धार काढून पोटापुरता पैसा कमावणारा माधव त्याच्या त्रिकोणी कुटुंबात सुखी आहे. पैसा नसला तरी आपल्या परीने तो कष्ट करून शंकरला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. खरंतर, शंकर हा त्यांचा पोटचा मुलगा नाही. त्याच्या एका मित्राने त्याला तो अनाथ म्हणून आणून दिलेला आहे. त्याला ऐकायला येतं पण मूकबधीर आई वडिलांसोबत राहिल्याने बोलता येत नाही, अशा स्थितीत तो मोठा होतो. खट्याळ, मस्तीखोर तरीही गोडुल्या अशा या शंकरची खरी आई पल्लवी एक दिवस तिच्या पतीसह गावडे दांपत्याच्या घरी थडकते. लग्नापूर्वीच्या संबंधातून शंकर तिला झालेला असतो आणि तिच्या वडिलांनी त्याच्या जन्मानंतर त्याला देऊन टाकलेलं असतं. वडिलांच्या मृत्युवेळी हे सत्य तिला कळल्याने ती धावत गावडे कुटुंबीयांकडे आलेली असते. अर्थात माधव आणि त्याची पत्नी दोघेही तिला शंकरला द्यायला नकार देतात. मग सुरू होतो तो शंकरवर कोणाचा हक्क आहे, हे सिद्ध करण्यासाठीचा कोर्टाचा लढा. तो जिंकावा म्हणून माधव आटोकाट प्रयत्न करतो. त्या प्रयत्नांची गोष्ट म्हणजेच बाबा हा चित्रपट आहे. तो या प्रयत्नात यशस्वी होतो की नाही, ते चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

पाहा बाबा चित्रपटाचा ट्रेलर –

कथा आणि पटकथा अत्यंत लोभसवाणी आहे. विषयावरून हा चित्रपट गंभीर पठडीतला असला तरी याची मांडणी उत्तम आहे. विशेष कौतुक करावं लागेल ते मूकबधीर व्यक्तींच्या चित्रीकरणाचं. यात कुठेही सबटायटल्स न वापरता फक्त चिन्ह भाषेच्या मदतीने पात्र एकमेकांशी संवाद साधताना दाखवण्यात आली आहेत. तो मूकसंवाद प्रेक्षकाला समजेल अशा रीतीने चित्रीत झाला आहे. त्यामुळे संवाद नसणं हा अडथळा वाटला तरी कथा कुठेच आपली पकड सोडत नाही. चित्रपटाच्या पटकथेत अनेक उणिवा आहेत. 1990चा काळ, त्यावेळचं राहणीमान हे सगळं चांगलं वठवलं असलं तरी काही त्रुटी राहून गेल्या आहेत. उदाहरणार्थ, माधवच्या उपजीविकेचं साधन दाखवताना थोडी गल्लत झाल्याचं दिसून येतं. शंकरची जन्मदाती आई आणि तिचा नवरा यांच्यातलं नातं खटकत राहतं, कारण ते अवास्तव वाटतं. पटकथेत अनेक त्रुटी असल्या तरी दिग्दर्शकाने चित्रपटाची मोट उत्तम बांधली आहे. त्याला कलाकारांनीही चांगली साथ दिली आहे. दीपक दोब्रियाल या अभिनेत्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. एका मूकबधीर व्यक्तिची भूमिका साकारताना त्याच्या चेहऱ्याने तो जे बोलून गेलाय, ते लाजवाब आहे. व्यक्तिरेखेची पितृत्वाने ओथंबलेली जाणीव त्याच्या डोळ्यांतून तो ज्या प्रकारे व्यक्त करतो, ते पाहण्यासारखं आहे. आपल्या मुलाला आपल्याकडे ठेवण्यासाठी जीवापाड मेहनत करणारा, त्यासाठी आपलं सगळं काही पणाला लावणारा बाबा त्याने अतिशय सुंदर साकारला आहे. अभिनेत्री नंदिता पाटकर हिच्या वाटेला जरी तुलनेने दुय्यम भूमिका असली तरी तिने त्या भूमिकेत जीव ओतला आहे. एकही शब्द न उच्चारता फक्त चेहऱ्याने आणि कायिक अभिनयाने ते दोघेही व्यक्त होतात. विशेष कौतुक ते शंकर झालेल्या आर्यन या बालकलाकाराचं. गोंडस हावभाव, लोभसवाणा चेहरा, कुरळे केस, दातपडकं गोड हसू आणि चेहऱ्यावरचं नितळ निरागसपण यातून त्याने शंकरची भूमिका जिवंत केली आहे. जयवंत वाडकर यांचे न्यायाधीश आणि जयंत गाडेकर यांचे वकील धमाल आणतात. पण, दुसरीकडे शंकरच्या जन्मदात्या आईच्या भूमिकेत स्पृहा जोशी आणि तिच्या पतीच्या भूमिकेत अभिजीत खांडकेकर अत्यंत मिसफिट वाटतात. त्यांच्या अभिनयात आता तोचतोचपणा जाणवू लागला आहे. बाकी व्यक्तिरेखाही ठीकठाक.

चित्रपटाच्या तांत्रिक बाबीही नीट आहेत. फक्त काही ठिकाणी संकलनात गडबड झाल्याने फ्रेममधल्या बारीकसारीक गोष्टी खटकतात. संगीताबाबत म्हणायचं झालं तर अडगुलं मडगुलं हे गाणं खूप गोड आहे. राज आर गुप्ता यांचं दिग्दर्शन या चित्रपटाला लाभलं आहे. दिग्दर्शक म्हणून ते आपल्या या पहिल्याच व्यावसायिक प्रयत्नात यशस्वी झाले आहेत. त्यांनी कथेला कुठेही सैल न सोडता त्यातल्या भावनांवर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे प्रेक्षक कथेत रमतो. माधव आणि शंकरच्या जगाशी स्वतःला जोडून पाहू शकतो. तेच राज यांचं यश म्हणता येईल.

पितृत्व ही एक सुंदर भावना आहे. त्याला कोणतीही बंधनं नाहीत. जन्मदाता नसूनही एखादा पुरुष अपत्यासाठी भावनिक असू शकतो, किंबहुना असतो. जिवाच्या आकांताने ते नातं जपण्याचा तो प्रयत्न करतो. माणसाची नात्यांची ओढ कित्येकदा त्याच्या रक्तापेक्षाही मायेने बांधलेली असते आणि ते बंधही तितकेच घट्ट असतात. ते निभावण्यासाठी शब्द नाही, संवाद महत्त्वाचा असतो, हे समजून घ्यायचं असेल तर ‘बाबा’ या चित्रपटाची वारी करावी लागते.

आपली प्रतिक्रिया द्या